अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:34+5:302021-08-20T04:39:34+5:30
अफगाणिस्तान ड्रायफ्रुट्सची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. अर्ध्याहून अधिक जगाला याच देशातून ड्रायफ्रुट्स निर्यात केले जातात. या देशात ड्रायफ्रुट्सचे मोठ्या ...
अफगाणिस्तान ड्रायफ्रुट्सची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. अर्ध्याहून अधिक जगाला याच देशातून ड्रायफ्रुट्स निर्यात केले जातात. या देशात ड्रायफ्रुट्सचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने वाहतुकीचा खर्च वगळता मिळणारे ड्रायफ्रुट्स कमी दरात मिळतात. मात्र, मागील काही दिवसांपासून याच देशात तालिबान संघटनेने तणाव निर्माण केल्यामुळे या देशाचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. या देशातून निर्यात होणाऱ्या मालावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील ड्रायफ्रुट्सच्या किमती चांगल्याच वाढल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना आता चढ्या भावाने ड्रायफ्रुट्स खरेदी करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हे पाहा भाव (प्रतिकिलो)
तणावापूर्वीचे भाव सध्याचे भाव
पिस्ता ८०० ९००
बदाम ७५० १२५०
मनुका खिसमिस ४०० ६००
अंजीर १२०० १४००
काजू ७०० ८००
एक आठवड्याचाच स्टॉक
सध्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्स विकले जातात. मात्र, सध्या शहरातील व्यापाऱ्यांकडे एक आठवडाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. तेव्हा साठा कमी असल्यामुळे साहजिकच असलेल्या मालावर जास्त नफा मिळविण्यासाठी व्यापारी आहे, त्या मालाची जादा दराने विक्री करीत असल्याची माहिती आहे.
दर पूर्ववत होणे कठीण
काही दिवसांपासून अफगाणिस्तानात तणाव असल्याने ड्रायफ्रुट्सची आयात थांबली आहे. त्यामुळेच दर वाढले आहेत. पुढील काही महिने असेच चित्र राहिल्यास बाजारात ड्रायफ्रुट्स संपुष्टात येईल आणि ज्यांनी स्टॉक करून ठेवला आहे, असे व्यापारी जादा दराने विकतील.
-शेख अकबर, ड्रायफ्रुट्स व्यावसायिक
अफगाणिस्तानातील तणावाचे स्थानिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाले आहेत. आता माल खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असून, सर्वसामान्य नागरिकांसह लहानमोठे व्यावसायिकही यामध्ये पिचले जात आहेत.
-शेख तनवीर, किराणा व्यावसायिक