मंडप व्यावसायिकांचे ३० कोटींचे अर्थकारण बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:52 AM2020-08-21T11:52:02+5:302020-08-21T11:52:14+5:30
यंदा लग्न सराईनंतर गणेशोत्सवाचा सिजनही वाया गेल्यामुळे या व्यवसायाचे अर्थकारण डबघाईस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सावर संक्रात आल्यामुळे जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांनाही कोट्यवधीचा फटका बसत असून बाजारपेठेतही मुंबईवरून लाईटींगसह सजावटीच्या साहित्याची कमतरता असल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, वर्षाकाठी जिल्ह्यात एका अंदाजानुसार जवळपास ३० कोटींपेक्षाही अधिक उलाढल होत असते. मात्र यंदा लग्न सराईनंतर गणेशोत्सवाचा सिजनही वाया गेल्यामुळे या व्यवसायाचे अर्थकारण डबघाईस आले आहे.
जिल्ह्यात दरवर्षी ९७३ ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केल्या जातो. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान एका मंडप व्यावसायिकाची दोन ते अडीच लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र यंदा ती पुर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे मंडप व्यावसायिकांचे सजावटीचे साहित्य, स्टेज, लाईटींग, साऊंड सिस्टीमही सध्या गोडावूनमध्येच पडून आहे. दरम्यान, लग्न सराई व गणेशोत्सवाचा महत्त्वाचा सिजनच हातचा गेल्याने काही मंडप व्यावसायिकांना त्यांच्याकडील फिक्स डिपॉजिटच मोडण्याची वेळ आली आहे. एका व्यावसायिकाने चक्क त्याची ही आपबिती बोलून दाखवली. जिल्ह्यात छोटे-मोठे मिळून जवळपास १,२०० च्या आसपास मंडप व्यावसायिक असून संघटनेमध्ये ३०० च्या आसपास व्यावसायिक सक्रीय आहेत. तर या व्यवसायावर काम करणारे जिल्ह्यात सुमारे चार हजार मजूर कार्यरत आहेत. त्यांच्या समोरही यामुळे संकट उभे ठाकले आहे. आता मिशीन बिगीन अगेनअंतर्गत प्रत्यक्षात सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कधी उठतात याकडे नजरा आहेत.
लग्न सराईत जवळपास पाच ते सहा लाखांचा तर गणेशोत्सवादरम्यान दोन ते अडीच लाख रुपायंची उलाढल ठप्प झाली आहे. परिणामी जवळ जे आहे त्यातच दैनंदिन गरजा सध्या भागवत आहोत.
- गजानन देशपांडे,
मंडप व्यावसायिक, बुलडाणा