तंटामुक्त गाव अभियानाकडे नऊ जिल्ह्यांनी फिरविली पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:10 AM2017-07-21T01:10:44+5:302017-07-21T01:10:44+5:30
राज्यातून प्रथम आलेल्या बुलडाण्याचाही समावेश
फहीम देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : "महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान" कार्यक्रमात २०१५-१६ वर्षांत राज्यातील नऊ जिल्हे सहभागीच झाले नाहीत. तंटामुक्तीत राज्यात पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यानेसुद्धा या लोकोपयोगी अभियानातून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी राज्य सरकारने २००७ मध्ये सुरू केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आता दुर्लक्षित होऊ लागली आहे. गेल्या वर्षी राज्यातील नऊ जिल्ह्यांनी यामध्ये सहभागच घेतला नाही. बुलडाणा जिल्ह्यासह जालना, बीड, नांदेड, गडचिरोली, सांगली, नंदूरबार, रायगड आणि ठाणे या नऊ जिल्ह्यांनी तंटामुक्ती कार्यक्रमात भागच घेतला नाही.
यामुळे शासनाने काढलेल्या यासंबंधीच्या परिपत्रकात बुलडाणा जिल्ह्याने स्वयंमूल्यमापनामध्ये सहभाग घेतला नाही, असे उल्लेखित केले आहे. २०१५-१६ मध्ये राज्यातील १५४ गावे तंटामुक्त झाली असून, त्यामध्ये सर्वाधिक ३४ गावे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. या गावांना लवकरच पुरस्कार मिळणार आहेत.
गावांनी स्वयंमूल्यमापनानुसार, गाव तंटामुक्त झाल्याचे घोषित केले. सदर गावांचे ५ मे, २०१६ ते ५जून २०१६ या कालावधीत मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये १५४ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली, २० जून २०१६ ते २० जुलै २०१६ या कालावधीत या गावाचे जिल्हा बाह्य मूल्यमापन करण्यात आले असून समित्यांनी आपला अहवाल सादर केला आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गावाकडून पोलीस प्रशासनाने अहवाल बोलावला नाही. शिवाय शासनाला कळविलेही नाही.
राज्यात २०१५-१६ मध्ये या अभियानास प्रतिसाद कमी मिळाला आणि परिणाम म्हणून तंटामुक्त गावांची संख्याही १५४ एवढीच राहिली.
बुलडाणा जिल्ह्यात सुरुवातीची काही वर्षे ही मोहीम वेगाने सुरू होती. गावागावात तंटामुक्तीचे वातावरण आणि पुरस्कार मिळविण्यासाठीची स्पर्धा सुरू होती. ग्रामस्थ आणि पोलीस अधिकारीही यामध्ये उत्साहाने सहभागी होत होते. त्यानंतर मात्र यातील उत्साह कमी होत गेला. अनेक गावांत केवळ कागदोपत्रीच कामकाज केले जाऊ लागले. अलीकडे मात्र सर्वच पातळ्यांवर ही योजना मागे पडली आहे.
या अभियानाला आता स्पर्धेच्या दृष्टीने नव्हे तर आवश्यकता समजून अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.
नागरिकांनी केले होते आंदोलन
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाकडे शासकीय पातळीवरून अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून या अभियानाच्या माध्यमातून गावा-गावांत शांतता प्रस्थापित होण्यास मोठी मदत होऊ शकते. या अभियानास मिळणारा प्रतिसाद कमी होणे योग्य नाही. जिल्ह्यात या अभियानास लोकचळवळीचे स्वरुप यावे, यासाठी सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे पुढारी प्रयत्न करू शकतात. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि प्रशासनही यासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
जिल्ह्यातील फक्त आठ गावे तंटामुक्त होणे बाकी
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी २०१२-१३ या कार्यकाळात बुलडाणा जिल्ह्यात तंटामुक्तीवर भरीव कामगिरी केल्याने जिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतींंपैकी ८५९ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत; मात्र त्यांच्या बदलीनंतर या अभियानावर मेहनत न झाल्याने तीन वर्षांचा कालावधी उलटला, तरी राहिलेली आठ गावे तंटामुक्त झालेली नाहीत. सध्याचे पोलीस अधीक्षक मीणा यांनी या लोकोपयोगी अभियानाला पुढे नेत त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण बुलडाणा जिल्हा तंटामुक्त करावा, अशी मागणी होत आहे.