तेरवीचे गोड जेवण सेवा संकल्पातील मनोरुग्णांना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:43+5:302021-06-09T04:42:43+5:30
कव्हळा येथील मुख्याध्यापक विजय वाघमारे यांच्या आई व माजी पं. स. सभापती सविता वाघमारे यांच्या सासू नर्मदाबाई विश्वनाथ वाघमारे ...
कव्हळा येथील मुख्याध्यापक विजय वाघमारे यांच्या आई व माजी पं. स. सभापती सविता वाघमारे यांच्या सासू नर्मदाबाई विश्वनाथ वाघमारे यांचे २७ मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतरचे सर्व विधी पार पाडल्यानंतर तेरवीचा खर्च टाळून तो सेवासंकल्पासाठी देण्याचा निर्णय वाघमारे दाम्पत्यांनी घेतला. तथापि, सध्याची कोरानाची स्थिती पाहता तेरवीच्या गोड जेवणातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचाही धोका होताच. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासह सेवासंकल्पात आश्रयास असलेल्यांना मदत व्हावी, या उदात्त हेतूने त्यांनी तेरवीचा कार्यक्रम रद्द करून त्यावर होणाऱ्या खर्चातून सेवासंकल्पवरील आश्रितांची एक दिवसाची भूक भागविण्यासाठी किराणा स्वरूपात मदत दिली. वाघमारे दाम्पत्याच्या या दातृत्वाबद्दल सेवासंकल्पचे नंदकुमार पालवे व आरती पालवे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
लहाने व अवचार यांच्याकडून मदत !
सेवासंकल्पात सद्यस्थितीत १२२ निराधार, अनाथ, मनोरुग्णांचा सांभाळ होत आहे. त्यांच्या सुविधेसाठी येथे बांधकामदेखील सुरू आहे. सेवासंकल्पातील सेवाकार्याची प्रत्यक्ष भेटीतून माहिती जाणून घेतल्यानंतर प्रा. विजय लहाने यांनी दरवर्षी १ क्विंटल गहू, तर विष्णू अवचार यांनी देणगी स्वरूपात मदत दिली आहे.