महामार्ग चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी मे २0१९ पर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:22 AM2017-12-22T00:22:52+5:302017-12-22T00:23:49+5:30
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटीएनएलची उपकंपनी असलेल्या अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडदरम्यान ८ सप्टेंबर २0१५ रोजी करार करण्यात आला. त्यानुसार कंत्राटदार कंपनीस मे २0१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटीएनएलची उपकंपनी असलेल्या अमरावती-चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडदरम्यान ८ सप्टेंबर २0१५ रोजी करार करण्यात आला. त्यानुसार कंत्राटदार कंपनीस मे २0१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे. याचा अर्थ काम पूर्ण करण्यासाठी आता कंपनीकडे दीड वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे; मात्र मोठय़ा पुलांच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नसल्याने काम मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता अत्यल्प दिसत आहे.
अमरावती-चिखली मार्गावर एकूण १४ मोठे पूल, चार रेल्वे ओव्हरब्रिज आणि अनेक छोटे पूल असतील. चौपदरीकरण करताना, अनेक जुन्या पुलांच्या लगत नवे पूल उभारावे लागणार आहेत, तर काही जुन्या पुलांचे रुंदीकरण व दुरुस्ती करावी लागणार आहे; मात्र अजूनही या मार्गावरील मोठय़ा पुलांच्या व रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला सुरुवात झालेली नाही.
करारानुसार प्रकल्प पूर्ण करण्याच्या मुदतीदरम्यान तीन ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ निर्धारित करण्यात आले आहेत. त्यापैकी दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ कंत्राटदार कंपनीच्या नियुक्तीनंतर ४00 व्या दिवशी पूर्ण होईल, असा उल्लेख करारात आहे. कंत्राटदार कंपनीच्या नियुक्तीची तारीख ९ नोव्हेंबर २0१६ ही आहे. त्यानुसार दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ १४ डिसेंबर २0१७ रोजी पूर्ण झाला. करारानुसार, दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदार कंपनीने सर्व पुलांच्या कामांना प्रारंभ करणे आणि एकूण प्रकल्प किमतीच्या किमान ३५ टक्के रक्कम खर्च केलेली असणे अभिप्रेत आहे. कंत्राटदार कंपनीने मोठय़ा पुलांच्या कामांना अद्याप प्रारंभ केलेला नसल्यामुळे, करारातील या शर्तीचा भंग झाल्याचे स्पष्ट होते.
मुदतीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारणी..
- अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेड कंपनीची नियुक्ती ९ नोव्हेंबर २0१६ रोजी झाली. करारानुसार त्या तारखेपासून ९१0 दिवसांच्या कालावधीत काम पूर्ण होणे गरजेचे आहे.
- निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास दंडाची आकारणी करण्याची तरतूद करारनाम्यात करण्यात आली आहे.
लांबीचा निकष
लांबीच्या निकषावर पुलांची निर्मिती होणार आहे. ६0 मीटर लांबीचे अंतर असल्यास त्या ठिकाणी मोठे पूल बांधले जातील. ६0 मीटरपेक्षा कमी; पण ८ मीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर लहान पूल बांधले जातील. ८ मीटरपेक्षा कमी अंतर असेल, तर कलव्हर्ट बांधण्यात येणार आहेत.
दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा
चौपदरीकरणाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आधीच नेमली गेली आहे. त्या यंत्रणेचे अधिकारी वेळोवेळी कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकार्यांना सूचना करीत असतात. त्यामुळे कामांचा दर्जा ढासळण्याची शक्यता नसल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे.
बोरगाव मंजू, खामगाव, नांदुर्यात नवे बायपास
विस्तार आणि लोकसंख्या जास्त असलेल्या तीन गावांच्या बाहेरून नवे वळणरस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये खामगाव, नांदुरा व बोरगाव मंजूचा समावेश आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची निर्मिती करताना, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन, पुलांची निर्मिती केली जाते. ऋतूनिहाय ते निर्णय घेतले जातात. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, हे महत्त्वाचे आहे. महामार्गाचे बांधकाम दीर्घकाळ चालत असते. त्यामुळे आधी पूल बांधणे तसे सोईस्कर असते. गरज आणि टोपोग्राफीवर ते अवलंबून असते.
- मुरलीधर जेठवाणी,
सेवानवृत्त अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
-