३ लाख ८0 हजार विद्यार्थ्यांची चाचणी
By Admin | Published: March 28, 2016 02:09 AM2016-03-28T02:09:05+5:302016-03-28T02:09:05+5:30
५ व ६ एप्रिलला परीक्षा; सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक.
हर्षनंदन वाघ / बुलडाणा
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता चाचणी ५ व ६ एप्रिल रोजी घेतली जाणार असून, जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ८0 हजार २५१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. सदर परीक्षा सर्व व्यवस्थापनाच्या आठ माध्यमांच्या तसेच सर्व बोर्डाच्या शाळेमध्ये होणार असून, शासनाने नियुक्त केलेली त्रयस्थ संस्था जिल्ह्यातील ६५ निवडक केंद्रांवर परीक्षा घेणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजनही केले आहे. भाषा व गणित विषयाचे पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था उपलब्ध करून देणार आहे.
गुणवत्तेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेता येऊन त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी शिक्षकाला विशेष प्रयत्न करता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे या चाचणीसाठी पुणे येथून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेले पेपर वापरले जाणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ८0 हजार २५१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. याअगोदर ऑक्टोबर महिन्यामध्ये अशा प्रकारची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये जिल्ह्यातील जवळपास २0 टक्के विद्यार्थी अप्रगत असल्याचे आढळून आले होते. ही परीक्षा सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. ५ एप्रिल रोजी भाषा तर ६ एप्रिल रोजी गणित विषयाची चाचणी घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेबरोबरच तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षासुद्धा त्याच दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी विशेष वर्ग घेऊन त्यांना प्रगत करण्याचे निर्देश शासनामार्फत दिले होते. ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन, डिजिटल यंत्नांचा वापर करून अध्यापन, विशेष वर्गाचे आयोजन करून अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला आहे.