रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर लोणार सराेवराच्या विकासाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 12:16 PM2021-02-06T12:16:16+5:302021-02-06T12:16:25+5:30

Uddhav Thackrey at Lonar लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पाहणी केली.

Testing the development of Lonar craters on the lines of Ranthambore National Park | रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर लोणार सराेवराच्या विकासाची चाचपणी

रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर लोणार सराेवराच्या विकासाची चाचपणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : पौराणिक, वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पाहणी केली. सोबतच लोणार सरोवर विकास आराखड्याची स्थानिकांचे प्रश्न समजावून घेऊन तथा सहकार्याने प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोणारमध्ये आगमन झाल्यानंतर  त्यांनी सरोवर काठावरील वनकुटी व्ह्यू पाॅईंटवरून पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराविषयी माहिती जाणून घेतली. दरम्यान, रणथंबोरच्या धर्तीवर लोणार सरोवर परिसराचा विकास होऊ शकतो का, याचीही चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि. प. अध्यक्ष मनीषा पवार, खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत यांच्यासह  पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे लोणार सरोवराचा विकास करताना नेमका कोणत्या पद्धतीने करावा, याचा विचार एकत्रितरीत्या करण्यात यावा. सरोवर परिसरात मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या ठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची  वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा.

 
धारतीर्थ विकासाबाबत सूचना
 धारतीर्थ परिसराची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी परिसर विकासाबाबत सूचनाही दिल्या. येथील जमिनीचे सपाटीकरण करून लॅण्डस्केप विकसित करावे ते मानवनिर्मित वाटू नये याची काळजी घेत नैसर्गिक टच दिला जावा. सौंदर्यीकरण करून शोभेची झाडे लावण्यात यावीत. परिसराच्या विकासासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे असे पाहणीही दरम्यान त्यांनी सांगितले. त्यानंतर दैत्यसूदन मंदिराला त्यांनी भेट दिली.  दैत्यसूदन मंदिरात आत जात मुख्यमंत्र्यांनी येथील ऐतिहासिक शिल्पाविषयी माहिती घेतली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत छायाचित्रण केले. कोरीव कामांचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. यावेळी लोणार सरोवराचे अभ्यासक स्व. सुधाकर बुगदाने यांच्या स्नुषा शैलेजा श्रीपाद बुगदाने व शुभदा स्वप्नील बुगदाने यांनी स्व. सुधाकर बुगदाने लिखित लोणार सरोवर हे पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिले.

Web Title: Testing the development of Lonar craters on the lines of Ranthambore National Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.