‘टीईटी’ अपात्र शिक्षकांच्या वेतनाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 02:11 PM2020-03-27T14:11:28+5:302020-03-27T14:11:34+5:30
प्राथमिक शिक्षण विभागाकडून टीईटी अपात्र शिक्षकांचे वेतन सध्या थांबविण्यात आलेले आहे.
- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा: ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्यासंदर्भात अमरावती विभागामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. अमरावती विभागातील बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाकडून टीईटी अपात्र शिक्षकांचे वेतन सध्या थांबविण्यात आलेले आहे. तर इतर जिल्ह्यात वेतन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील टीईटी अपात्र शिक्षकांवर सध्या अन्याय होत आहे.
प्राथमिक शिक्षकांकरीता (इयत्ता पहिली ते आठवी) शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना बुलडाणा येथील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. त्यानुसार १३ फेब्रुवारी २०१३ नंतर ६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या अनुदानित, विनाअनुदानित यासह सर्व माध्यमाच्या शाळांवरील प्राथमिक शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण नसलेल्याने वेतन थांबविण्यात आले आहेत. अमरावती, यवतमाळ, भंडारा, नागपूर, जालना, जळगाव, औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे ह्या सर्व ठिकाणच्या टीईटी अपात्र शिक्षकाचे वेतन सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातीलच शिक्षकांवर अन्याय का? असा प्रश्न टीईटी अपात्र शिक्षकांकडून उपस्थित होत आहे. १ जानेवारी २०२० पासून जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याबाबत आल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी खान यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
माध्यमिकच्या शिक्षकांचे वेतन सुरू
पाचवी ते आठवीपर्यंतच्या काही शाळांचे वेतन हे माध्यमिक शिक्षण विभागाकडून केले जाते. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाकडून टीईटी अपात्र शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले; मात्र माध्यमिक शिक्षण विभागाकडून येणाºया शिक्षकांचे वेतन सुरू आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन सुरळीत सुरू आहे. वेतन थांबविण्या संदर्भात कुठलाही आदेश नाही.
-डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणिकारी बुलडाणा.
बुलडाणा वगळता इतर ठिकाणी टीईटी पात्र नसलेल्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन सुरू करण्यात यावे, यासाठी वरिष्ठांशी बोलणे झाले आहे. लवकरच या शिक्षकांचाही प्रश्न सुटेल.
-संगीता शिंदे, अध्यक्ष, शिक्षण संघर्ष संघटना, अमरावती.