टीइटी परीक्षा शुल्काचा "गल्ला" कोटींच्या घरात!
By admin | Published: July 3, 2017 08:11 PM2017-07-03T20:11:48+5:302017-07-03T20:37:25+5:30
राज्यभरातून २ लाख ३० हजार अर्ज: लाखो भावि शिक्षक बेरोजगारीच्या खाईत
ब्रम्हानंद जाधव / बुलडाणा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २०१३ पासून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये दोन पेपरसाठी ८०० रुपये व एक पेपर देणाऱ्यांसाठी ५०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. यावर्षी २२ जुलै रोजी होणाऱ्या टीईटीसाठी राज्यभरातून २ लाख ३० हजार अर्ज आले असून, दरवर्षी टीइटी परीक्षा शुल्काचा ह्यगल्लाह्ण कोटी रुपयांच्या घरात जात आहे.
डी.एड्. व बी.एड्. पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्या तुलनेत शिक्षकांची भरती केल्या जात नाही. राज्यात आवश्यकतेपेक्षा जास्त अध्यापक विद्यालयांना मान्यता मिळाल्याने विषम परिस्थिती निर्माण झाली आहे. गत सात वर्षापासून शिक्षकांची भरती केली नसल्याने अध्यापक पदविका प्राप्त करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. सर्वच डी.एड्. व बी.एड्.धारकांना नोकरी देणे शक्य नसल्याने शासनाने सन २०१३ पासून महाराष्ट्र राज्य परीषा परिषद, पुणेकडे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी स्विकारली. पहिल्याचवर्षी मोठ्या उत्साहात लाखो भावि शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. मात्र, या परीक्षेवर केवळ शिक्षकांची पात्रता तपासण्यात येणार असून त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी लागणार नाही. यामुळे टीईटी देणाऱ्या भावि शिक्षकांमध्ये निरुत्साह निर्माण झाला. २०१३ पासून दरवर्षी शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जात आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी प्राथमिक स्तरावरिल पेपर एक घेण्यात येत आहे. या पेपरसाठी ५०० रुपये शुल्क ठेवण्यात आला आहे. तर इयत्ता ६ वी ते ८ वी या वर्गासाठी अध्यापन करून इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी उच्च प्राथमिक स्तरावरिल पेपर दोन घेण्यात येतो. या पेपरसाठी सुद्धा ५०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करून इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य ठेवण्यात आले असून, त्यासाठी ८०० रुपये शुल्क आकारण्यात येतो. यावर्षी २२ जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवेदन पत्र व परीक्षा शुल्क आॅनलाईन भरण्याकरिता १५ जून ते १ जुलैपर्यंत कालावाधी देण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडे राज्यभरातून २ लाख ३३ हजार उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. यातून कोटी रुपयेंचा परीक्षा शुल्क दरवर्षी शासनस्तरावर जमा होत आहे. मात्र, परीक्षांर्थींना नोकरीच्या प्रतीक्षेतच रहावे लागत आहे.
जिल्हानिहाय यादी अद्याप अस्पष्ट
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यासाठी यावर्षी होणाऱ्या २२ जुलै रोजीच्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी १५ जून ते १ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरण्यात आले. ३ जुलैपर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केवळ राज्यभरातून आलेल्या २ लाख ३० हजार अर्जाचा आकडा आला होता. मात्र, प्रशासनाकडून जिल्हानिहाय यादी अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही. अर्ज व परीक्षा शुल्क याचा सर्व ताळेबंद जुळल्यानंतर यादी स्पष्ट होणार आहे.