टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:24 AM2021-07-01T04:24:03+5:302021-07-01T04:24:03+5:30
बुलडाणा : टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, याबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे टीईटी अनुत्तीर्ण अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या ...
बुलडाणा : टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, याबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे टीईटी अनुत्तीर्ण अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना आपल्या दहा ते बारा वर्षांच्या नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. सेवेत असणारे शिक्षक वगळून नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार शाळांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक करण्यात आली. मात्र, या निर्णयामुळे सुमारे आठ ते दहा वर्षांपासून शाळांमध्ये नोकरी करणारे शिक्षक अडचणीत सापडले. राज्यातील तब्बल २० ते २५ हजार शिक्षकांना नोकरी गमवावी लागू शकते. त्यामुळेच राज्यातील उच्च न्यायालयामध्ये याबाबत विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात औरंगाबाद उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. परंतु, इतर उच्च न्यायालयांमध्येसुद्धा याबाबत स्वतंत्रपणे याचिका दाखल आहेत. टीईटी परीक्षा एकदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय नुकताच केंद्र शासनाने घेतला. त्यामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला. परंतु, टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. बुलडाणा जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील अनेक शिक्षकांना या संदर्भातील निर्णयाचा फटका बसू शकतो.
.........काय म्हणतात शिक्षक..........
माझ्यासह अनेक शिक्षकांनी विनाअनुदानित शाळांवर सहा ते सात वर्षे विनावेतन काम केले आहे. त्यातील काही शाळा अंशतः अनुदानावर आल्यानंतर शासनाने टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. शासननिर्णयापूर्वी नियुक्त असणाऱ्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणे सयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे शासनाने सेवेत असणाऱ्या शिक्षकांना टीईटीतून वगळावे.
-यू. एन. मोरे, शिक्षक.
टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांना शासनाने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणखी काही संधी द्याव्यात. सेवेत असणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून कमी केल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न वाढणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठी आणखी एक संधी देणे उचित ठरेल.
-...............,शिक्षक.
.........संघटनांचा विरोध.............
टीईटी परीक्षेची काठिण्य पातळी जास्त आहे. त्यामुळे सेवेत राहून पुरेशी तयारी करता न आल्याने काही शिक्षक अनुत्तीर्ण झाले आहेत. प्रदीर्घ सेवा झालेली असताना त्यांना सेवेतून कमी करणे योग्य नाही. त्यांना सेवेत कायम ठेवावे किंवा परीक्षेसाठी कालावधी वाढवून द्यावा.
-संतोष वेरुळकार, तालुका सहसचिव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेना.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांचे पगार गेल्या दहा ते बारा महिन्यांपासून थांबवण्यात आले आहेत. यातील बहुतांश शिक्षक शाळा विनाअनुदानित असतानापासून विनावेतन काम करत आहेत. परंतु आता टीईटी उत्तीर्णची अट लादल्याने या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-गिरीश मखमले, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटना.
जिल्ह्यात एकूण शिक्षक : १७ हजार
जिल्हा परिषद : ६ हजार ५००
उर्वरित : १० हजार ५००