खामगावात १00 एकरावर होणार टेक्सटाइल पार्क - मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:17 AM2018-02-18T01:17:52+5:302018-02-18T01:18:23+5:30

राज्यभरात टेक्सटाइल पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामधील एक टेक्सटाइल पार्क खामगावात होणार असून, त्याकरिता कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुढाकाराने १00 एकर जमीन उपलब्ध झाल्याने लवकरच हा टेक्सटाइल पार्क सुरू करु, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.

Textile Park at Khamagawa, 100 acres - Chief Minister's announcement | खामगावात १00 एकरावर होणार टेक्सटाइल पार्क - मुख्यमंत्र्यांची घोषणा

खामगावात १00 एकरावर होणार टेक्सटाइल पार्क - मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगाव पेठच्या धर्तीवर ‘कापूस ते तयार कपडे’ धोरण राबविण्याचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  राज्य शासन बळीराजाच्या उत्थानासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कार्य करीत असून कापूस ते कापड, कापड ते तयार कपडे, तयार कपडे ते कपड्यांची निर्यात, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी राज्यभरात टेक्सटाइल पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामधील एक टेक्सटाइल पार्क खामगावात होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. 
शासकीय तंत्र निकेतन मैदानावर आयोजित कृषी महोत्सव-२0१८ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी फलोत्पादन मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, खा.प्रतापराव जाधव, खा.रक्षा खडसे, आ.डॉ.संजय कुटे, आ.डॉ. संजय रायमुलकर, आ.अँड. आकाश फुंडकर, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, नगराध्यक्ष अनिता डवरे,  महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले,   डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.वेंकटेश्‍वरलु आदी उपस्थित होते.
 मुख्यमंत्री म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे निर्माण झालेला टेक्सटाइल पार्क शेतकर्‍यांनी जावून बघावा. जिथे दोन वर्षांपूर्वी काळे कुत्रेही फिरकत नव्हते, तिथे आता अजिबात जमीन शिल्लक नाही, असाच पार्क आता खामगाव येथे तयार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

सर्वाधिक गारपिटीचा फटका बुलडाण्यालाच!
सर्वाधिक कर्जमाफी बुलडाण्याला मिळाली, तसाच गारपिटीचा सर्वाधिक फटकाही बुलडाण्याला बसला आहे. राज्यात १ लाख २५ हजार हेक्टर जमिनीला गारपिटीने तडाखा दिला. त्यापैकी ४0 हजार हेक्टर क्षेत्र एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून, नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरच मदतीचे वाटपही सुरू होईल, असा विश्‍वास त्यांनी दिला. 

शेतकर्‍यांना लवकरच १२ तास सौरउर्जा
शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज देण्याचे धोरण आमच्या सरकारने आखले असून, त्यासाठी सौरउज्रेचा पर्याय निवडला आहे. एक हजार मेगावॉट सौर वीज निर्मितीचे टेंडर काढले असून, यापैकी ५00 मेगावॉट वीज निर्मितीकरिता कामास सुरूवात झाली आहे. कृषी पंपांना वीज पुरवठा करणारे कृषी फिडर हेच सौर उज्रेवर कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच गटशेतीला प्रोत्साहन देताना २ लाख ५0 हजार युवकांना शेती कौशल्य तंत्रज्ञान शिकवणार असून, असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

सर्वाधिक कर्जमाफी बुलडाण्यात
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफी योजनेचा सर्वाधिक लाभ बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. अर्ज केलेल्या २ लाख ५0 हजार ७४५ शेतकर्‍यांपैकी आतापर्यंत २ लाख १३ हजार २८९ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, ही रक्कम तब्बल ११२९ कोटी रुपये एवढी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  काँग्रेसच्या कार्यकाळात संपूर्ण विदर्भाला २५0 कोटीची कर्जमाफी मिळाली होती. आता एकट्या बुलडाण्याला ११२९ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. ही आकडेवारीच शेतकर्‍यांचे हित कोणत्या सरकारने जपले हे दर्शविते, असे त्यांनी स्पष्ट  केले.

जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा सुजलाम सुफलाम
अखिल भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांनी जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संघटनेच्यावतीने १५१ जेसीबी बुलडाणा जिल्ह्यात दाखल होत असून, जलयुक्त शिवार योजनेतील सर्व कामे अवघ्या काही दिवसात पूर्ण होतील व हा जिल्हा सुजलाम सुफलाम करून मॉडल जिल्हा म्हणून विकसित करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

१५१ शेतकर्‍यांना ट्रॅक्टरचे वाटप
शेतीचे यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ट्रॅक्टरचे वाटप केले जात आहे. त्यामध्ये कृषी महोत्सवाच्या निमित्ताने १५१ शेतकर्‍यांना ट्रॅक्टर देण्यात आले, यापैकी नीता भागवत ठाकरे व विजय शालीग्राम खंडारे या दोन शेतकर्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राधिनिधीक स्वरूपात ट्रॅक्टरची चावी प्रदान करण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांनी केले भाऊसाहेबांचे कौतुक 
कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर हे अतिशय संवेदनशील मंत्री आहेत. गारपिटीचे संकट कोसळले. त्याच दिवशी त्यांनी नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अवघ्या दोन दिवसात संपूर्ण राज्यातील पंचनामे पूर्ण केले. लगेच नुकसानाचा अहवाल तयार केला व मदतीसाठी प्रस्ताव ‘कॅबिनेट’समोर ठेवला. ‘कॅबिनेट’ने तो प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे मदतीसाठी पाठविला आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना लवकरच मदत मिळू शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

जिल्ह्यातील शेतकरी आधुनिकतेकडे वळतोय - ना.फुंडकर
‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ या धोरणांतर्गत शेतीचे यांत्रिकीकरण ही योजना कृषी विभागाने सुरू केली, याचा सर्वाधिक लाभ विदर्भातील शेतकर्‍यांनी घेतला असून, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आघाडीवर असल्याचे ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील तब्बल ५00 शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर घेतले असून, मागेल त्याला ट्रॅक्टर देण्याचे काम हे सरकार करीत आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक, या योजनांना शेतकर्‍यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. तब्बल ८४0 कांदाचाळी जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. कितीही संकटे आली, तरी शेतकरी गंभीरपणे संकटाला तोंड देतो व सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहते, हे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे, असा दावा ना. फुंडकर यांनी केला. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत शेतकरी आधुनिकतेकडे वळत असल्याचेही ते म्हणाले.
 

Web Title: Textile Park at Khamagawa, 100 acres - Chief Minister's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.