गुळगुळीत रस्त्यांवर थातूरमातूर ‘सिलकोट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 03:48 PM2020-01-07T15:48:38+5:302020-01-07T15:48:49+5:30
काही भागात नवीन रस्ते तयार करण्याचे काम सुरु आहे तर काही ठिकाणी जुन्याच रस्त्यांवर कारपेटसह सिलकोट करण्याचे काम सुरु आहे.
- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव शहराअंतर्गत नविन रस्ते, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसह डांबरीकरणाचा धडाका पालिकेने लावला आहे. मात्र हे काम करीत असताना संबधित कंत्राटदाराकडून बोगस कामे होत असल्याचे दिसून येते. अनेक भागात थातूरमातूर कामे सुरु आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दबाईसाठी विटांच्या भट्टीतील भूसभूसीत मटेरीयल वापरले जात असल्याचे दिसून येते.
सध्या खामगाव पालिकेमार्फत शहरातील विविध प्रभागाअंतर्गत काही भागात नवीन रस्ते तयार करण्याचे काम सुरु आहे तर काही ठिकाणी जुन्याच रस्त्यांवर कारपेटसह सिलकोट करण्याचे काम सुरु आहे. विकासाच्या नावावर पालिका प्रशासनाकडून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे काही नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून या प्रकाराकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे दिसून येते.
तर काही भागात रस्त्याच्या निर्मितीसाठी विटांच्या भूसभूसीत मटेरियलचा वापर केला जात आहे. या सर्व प्रकाराची नगराध्यक्षा अनिताताई डवरे यांनी दखल घेवून मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्याची गरज आहे.
नाहीतर शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे प्रस्तावित नवीन कामेही थातूरमातूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी धनंजय बोरिकर यांनी या सर्व कामाची पाहणी करून रस्ता कामांच्या गुणवत्तेबाबत शहानिशा करून गैरप्रकार थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
शेगाव नाका ते यशोधरानगपरर्यंतच्या कामाची पाहणी केली. आपले म्हणणे बरोबर आहे. काहीठिकाणी व्यवस्थीत काम झाले नाही. संबधित कंत्राटदाराला काम चांगले काम करण्यास सुचना दिल्या आहेत. चुकीचे काम खामगाव पालिका खपवून घेणार नाही.
- शुभम कुलकर्णी,
अभियंता, न.प.खामगाव