जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी थाळीनाद
By अनिल गवई | Published: March 20, 2023 05:39 PM2023-03-20T17:39:38+5:302023-03-20T17:39:52+5:30
कर्मचाऱ्यांनी मुलाबाळांसह थाळीनाद आंदोलन केले.
खामगाव : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सोमवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी मुलाबाळांसह थाळीनाद आंदोलन केले.
शासकीय, निमशासकीय तसेच खासगी राज्य कर्मचारी कृती समितीच्या वतीने १४ मार्च रोजी संपाचे हत्यार उपसण्यात आले. दरम्यान, गत सात दिवसांपासून विविध आंदोलन केली जात आहे. दरम्यान, सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. यामध्ये सोमवारी कर्मचारी कृती समितीच्या वतीने थालीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भजन गात शासनाचा निषेधही करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
काँग्रेस, वंचितचा पाठिंबा
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुकारलेल्या आंदाेलनाला काँग्रेसच्या वतीने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसे पत्र समितीच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.