आधार लिंकची थाप, ओटीपी देताच सव्वाचार लाख हडप; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल
By अनिल गवई | Published: May 17, 2024 06:34 PM2024-05-17T18:34:02+5:302024-05-17T18:34:18+5:30
हा धक्कादायक प्रकार आता उजेडात आला असून याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
खामगाव : बँक खात्याला आधारकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय इसमाचा तब्बल सव्वाचार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा धक्कादायक प्रकार आता उजेडात आला असून याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, अशोक कृष्णाजी इटे ५५ रा. बाळापूर फैल यांच्या मोबाइलवर ६२८९५०५८७३ या क्रमांकावरून २ मे रोजी सकाळी ११ वाजता संपर्क करण्यात आला. बँक अधिकारी असल्याचे भासवीत खात्याला आधारकार्ड लिंक करण्याची बतावणी केली. वारंवार संपर्क साधून अशोक इटे यांच्याकडून ओटीपीसह बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर सहा टप्प्यात त्याने इटे यांच्या खात्यातून ४ लाख २५ हजार १६७ रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा आरोप इटे यांनी तक्रारीत केला. याप्रकरणी तक्रारीवरून १६ मे रोजी सायबर सेल बुलढाणा यांनी अज्ञात संशयिताविरोधात भादंवि कलम ४१९, ४२० सहकलम ६६ सी तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल केला.