तलाठ्यांचे उघड्यावर कार्यालय थाटून आंदोलन
By admin | Published: July 1, 2017 12:24 AM2017-07-01T00:24:25+5:302017-07-01T00:24:25+5:30
लक्ष वेधण्यासाठी चिखली तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी ३० जून रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात उघड्यावर बसून कार्यालयीन काम केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांचे भाडे सन २०१२ पासून देण्यात आले नाही. त्यामुळे याचा आर्थिक बोझा तलाठ्यांना सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी ३० जून रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात उघड्यावर बसून कार्यालयीन काम केले.
शासनाने ५ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेले तलाठी कार्यालयाचे भाडे तलाठ्यांना नियमित मिळत नसल्याने संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे ४ कोटी रूपयांच्या आसपास तलाठी कार्यालयांचे भाडे थकलेले आहे. याची दखल घेवून तातडीने या समस्येचा निपटारा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा विदर्भ पटवारी संघाच्यावतीने देण्यात आला आहे. तत्पूर्वी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी आपले संपूर्ण दप्तर घेवून तहसील आवारात उघड्यावर वसून काम केले. दरम्यान या आंदोलनास माजी आमदार रेखाताई खेडेकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर, अशोक डुकरे, सुरेशआप्पा खबुतरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, बाजार समितीचे सभपती डॉ.सत्येंद्र भुसारी, संजय पांढरे, ओमप्रकाश भुतेकर, गजानन वायाळ, समाधान सुपेकर, रवि डाळीमकर, बाळासाहेब पवार, ज्ञानेश्वर सुरूशे यांनी भेट दिली. या आंदोलनात पटवारी संघाचे विदर्भाध्यक्ष मनोज दांडगे, जिल्हा सचिव रमाकांत माकोने, शशिकांत वानखेडे, उपविभाग अध्यक्ष संजय डुकरे पाटील, विजय बोराखडे, उपाध्यक्ष सुधाकर गिरे, तालुकाध्यक्ष संतोष राठोड, सचिव अनिल जाधव, उपाध्यक्ष परसराम सोळंकी, सुनिल डव्हळे, विकास कस्तुरे आदी पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्व तलाठी सहभागी झाले होते. दरम्यान या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास जिल्हाभरातील तलाठी १ आॅगस्ट महसूल दिनावर बहिष्कार टाकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडतील असा ईशारा यावेळी मनोज दांडगे यांनी दिला.