दुचाकीस्वाराला वाहनाचा कट लागला अन् २० लाखांचा गुटखा पोलिसांच्या हाती लागला
By निलेश जोशी | Published: November 7, 2023 07:50 PM2023-11-07T19:50:54+5:302023-11-07T19:51:06+5:30
दुचाकीस्वार जखमी: दोन आरोपी ताब्यात
धाड (जि. बुलढाणा) : येथील बायपासवर एका वाहनाने दुचाकीस्वाराल कट मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र वाहनातील दोघांच्या संशयास्पद हालचाली आणि वक्तव्य पहाता पोलिसांना संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात २० लाख रुपायंचा गुटखा आढळून आला. प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना बुलढाणा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हा अपघात ७ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला. मध्यप्रदेशातूनहा गुटखा येत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. एमएच-२१-बीएच-६२९३ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाद्वारे हा गुटखा जालना येथे नेण्यात येत होता. दरम्यान ढालसावंगी येथील दुचाकीस्वार शेख इसाक शेख लुकमान (५५) हा दुचाकीस्वार रस्त्याने जात असताना धाड येथील बायपासवर त्याला एमएच-२१-बीएच-६२९३ या मालवाहू वाहनाचा कट लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार मनिष गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस बुलढाणा येथे उपचारासाठी हलविले. सोबत मालवाहू वाहनातील व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात हा गुटखा आढळून आला.
प्रकरणी संदीप बाजीराव मोरे (अेामसाईनगर जालना) आणि गणेश रामप्रसाद यादव (२३, रा. जालना) यांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
वरिष्ठस्तरावर घटनेची नोंद-
योगायोगाने अपघातामुळे हा २० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्याची पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली. मात्र मध्यप्रदेशातून बुलढाणा मार्गे थेट जालन्यात हा गुटखा नेल्यात होता. त्यामुळे प्रकरणाच्या खोलात गेल्यास गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरणाचा तपास एएसआय माेरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र बऱ्हाटे, संदीप कायंदे, भास्कर लवंगे, इश्वर हाजवरे, राजू माळी, सोहेल शेख, शंकर वाघ व त्यांचे सहकारी करत आहेत.