राजुर घाटात बस उलटली, सुदैवाने प्राणहानी टळली
By संदीप वानखेडे | Published: July 25, 2023 06:51 PM2023-07-25T18:51:19+5:302023-07-25T18:51:48+5:30
ही बस मलकापूर येथून बुलढाणाकडे (बस क्रमांक एमएच ०६ एस ८३७५) येत हाेती.
बुलढाणा : ब्रेक निकामी झाल्याने मलकापूर येथून बुलढाणा शहरात येणारी बस राजूर घाटात उलटली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने या अपघातात सात प्रवासी किरकाेळ जखमी झाले. ही घटना दि. २५ जुलै राेजी दुपारी घडली.
ही बस मलकापूर येथून बुलढाणाकडे (बस क्रमांक एमएच ०६ एस ८३७५) येत हाेती. दरम्यान, राजूर घाटात चालकाकडून गेअर बदलताना बस न्यूटन झाली़ उतार असल्याने ही बस रिव्हर्स झाली. काही अंतरावर गेल्याने बस उलटली. या अपघातात महादेव ताेताराम दाभाडे (रा. उमरा), सबरू संघा सगाेरा (रा. तराेडा), शे. रफीक शे. अनीस रा. राजूर, आशाबाई सूर्यासिंग भाेकन (रा. तराेडा), समशाद बिलाल शे. बिलाल (रा. काेथळी), विठ्ठल रामसिंग धाेती (रा. तराेडा), मेशसिंग रामधन बिरबस्सी आदी किरकाेळ जखमी झाले. या प्रवाशांवर उपचार केल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली.
मदतीसाठी सरसावले हात
अपघाताची माहिती मिळताच युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, श्रीकांत गायकवाड, दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, शुभम दांडगे, करण हिवाले, विकी राऊत आदींसह इतरांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले.
भंगार बसेसचा प्रश्न ऐरणीवर
जिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये भंगार झालेल्या बसेसची संख्या वाढली आहे. त्यातच लांब पल्ल्यासाठी या भंगार बसेस लावण्यात येतात. त्यामुळे अनेक वेळा बस बाेथा आणि राजूर घाटातून चढताना बंद पडतात. त्यामुळे, प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागताे.