अकोला येथून धान्य उचलीचा तिढा सुटता सुटेना!
By अनिल गवई | Published: March 6, 2024 08:28 PM2024-03-06T20:28:52+5:302024-03-06T20:29:08+5:30
बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाकडून आता अवर सचिवांकडे तक्रार.
खामगाव: अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या (सीडब्ल्यूसी गोदाम ) क्रमांक १ आणि २ येथून धान्य उचल पूर्ण क्षमतेने दिली जात नसल्याने मेटाकुटीस आलेल्या जिल्हा पुरवठा विभागाने अखेर अन्न व नागरी पुरवठा विभागाचा दरवाजा ठोठावला आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही केंद्रीय वखार महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याने, बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाने आता याबाबत अवर सचिवांकडे तक्रारी केली आहे. त्यामुळे अकोला येथील केंद्रीय वखार महामंडळ आणि बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागात चांगलीच जंुपली असल्याचे चित्र आहे.
प्राप्त माहितीनुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांच्या गहू व तांदळाची उचल अकोला येथील वखार महामंडळाच्या दोन गोदामातून सुरू आहे. मात्र, या गोदामातून धान्याच्या उचलीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. परिणामी, बुलडाणा जिल्ह्यातील धान्य वाहतूक व वितरण प्रणाली संकटात सापडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. िजल्हा पुरवठा विभागाकडून भारतीय वखार महामंडळाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही अधिकाअधिक वाहने भरून उचल देण्यासाठी दुर्लक्ष केल्या जात असल्याचा अारोपही पत्रात करण्यात आला आहे. अकोला येथील गोदामातून वारंवार धान्य उचलीबाबत समस्या निर्माण होत असल्याने पर्यायी गोदामातून धान्याची उचल करण्यासाठी प्रयत्न करण्याचीही मागणी आता जोर धरू लागली आहे.
हजारो मेट्रीक टन धान्याची उचल प्रलंबित
बुलढाणा जिल्ह्याची मार्च २०२४ या महिन्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या गहू व तांदळाच्या नियतनाची उचल सुरू असून दहा हजार मे.टन नियतनापैकी तब्बल सातहजारापेक्षा अधिक मे. टन धान्याची उचल प्रलंबित असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच एप्रिल महिन्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे गहू व तांदळाचे संपूर्ण दहा हजारपेक्षा अधिक मेट्रीक टन नियतनाची उचल प्रलंबित
धान्य व्यपगत होण्याची भीती.
आगामी सणासुदीच्या दिवसांत पुरेशा प्रमाणात गहू, तांदळाची उचल मिळत नसल्याने धान्य व्यपगत होण्याची भीती जिल्हा पुरवठा विभागाने वर्तविली आहे. तसेच लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यताही वर्तविल्याचे समजते. या तांत्रिक अडचणींमुळे सुटीच्या दिवशीही उचल देण्यासाठी पुरवठा विभागाने पत्र दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.