मुख्याध्यापिकेवर बालकाच्या लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
By सदानंद सिरसाट | Published: March 22, 2024 03:19 PM2024-03-22T15:19:20+5:302024-03-22T15:19:31+5:30
तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. याबाबत ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली.
खामगाव : निकृष्ट दर्जाची केळी दिल्याचा जाब पालकाने विचारल्यानंतर वर्गखोलीत पाल्याचे कपडे काढून आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी शेगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेवर शेगाव ग्रामीण पोलिसात विविध कलमान्वये गुरुवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले.
तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. याबाबत ८ वर्षीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये १५ मार्च रोजी शाळेत पोषण आहारांतर्गत केळी वाटप करण्यात आली. ती काळी पडलेली होती. याबाबत मुलाने वडिलांना माहिती दिली. त्यांनी शाळेत येत विचारणा केली. त्यावेळी मुख्याध्यापिकेने पालकांशी वाद घातला. त्यानंतर वर्गात जाऊन विद्यार्थ्याला धाकदपटशा केला. तक्रारी करतो का, माझी बदली करतो का, अशी विचारणा केली. तसेच थांब तुला दाखवते, असे म्हणत विद्यार्थ्याचे कपडे काढून आक्षेपार्ह वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद केले.
या प्रकाराने घाबरलेला विद्यार्थी पळत निघाला. त्यावेळी त्याच्या पायाला मार लागला, असेही नमूद आहे. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३,५०६, सहकलम ८,१० बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सहकलम, ३ (१)(आर), ३(२),(व्हीए) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे करीत आहेत.