बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करणाऱ्याचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Published: August 16, 2023 04:53 PM2023-08-16T16:53:58+5:302023-08-16T16:54:25+5:30
बुलढाणा शहर पाेलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा : जागेच्या वादातून हाेत असलेल्या त्रासाला कंटाळून अरविंद दिनकर वाघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ जुलै राेजी विष प्राशन केले हाेते. त्यांचा उपचारादरम्यान १५ ऑगस्ट राेजी मृत्यू झाला. या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अर्चना वाघ यांनी शहर पाेलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे पती अरविंद वाघ व आराेपी दिनकर विठोबा वाघ, बाबुराव विठोबा वाघ, कलाबाई बाबुराव वाघ, गणेश बाबुराव वाघ (सर्व रा. चिखला, ता. जि. बुलढाणा) यांच्याबराेबर गत दहा वर्षांपासून जमिनीचा वाद आहे. आराेपींच्या त्रासाला कंटाळून अरविंद वाघ यांनी २७ जुलै राेजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विषारी औषध प्राशन केले हाेते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.
उपचारादरम्यान अरविंद वाघ यांचा १५ ऑगस्ट राेजी सकाळी मृत्यू झाला़ आराेपींच्या त्रासाला कंटाळूनच पतीने विष प्राशन केल्याचे अर्चना वाघ यांनी पाेलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून बुलढाणा शहर पाेलिसांनी चारही आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय लाेधी करीत आहेत.