बस चालवायचे साेडून चालकाने काढली प्रवासी महिलेची छेड, विनयभंगाचा गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Published: March 13, 2023 06:16 PM2023-03-13T18:16:59+5:302023-03-13T18:18:11+5:30
वाशिमवरून पुणे येथे प्रवासी करणाऱ्या खासगी बस क्र. एमएच ०४ जीपी १२८८ ही रविवारी संध्याकाळी निघाली हाेती.
सुलतानपूर : रात्रीचा प्रवास आणि ताेही खासगी बसने एकट्या दुकट्या महिलेला किती घातक ठरू शकताे, हे १२ मार्च राेजी वाशिम ते पुणे जाणाऱ्या एका खासगी बसमधील प्रसंगावरून अधाेरेखीत हाेत आहे़ कारण वाशिमवरून पुणे जाताना एका महिलेची त्या बसच्या चालकाने वाहन चालवणे साेडून चक्क छेड काढली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून त्या बस चालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यावेळी गर्दीचा फायदा घेत चालक फरार झाला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मेहकर पाेलिसांनी आराेपी खासगी बसचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
वाशिमवरून पुणे येथे प्रवासी करणाऱ्या खासगी बस क्र. एमएच ०४ जीपी १२८८ ही रविवारी संध्याकाळी निघाली हाेती. यामध्ये वाशिम जिल्ह्यातीलच एका गावातील २६ वर्षीय महिला पुणे येथे जाण्यासाठी या बसमध्ये बसली हाेती. दरम्यान, रिसाेडच्या समाेर आल्यानंतर खासगी बसचालक आसीफ शे बागा (वय ३०, रा. व्याड, जि. वाशिम) याने महिलेबराेबर लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने धास्तावलेल्या महिलेने हा प्रकार आपल्या नातेवाइकांना कळविला. त्यामुळे रात्री १०:१५ वाजता पीडितेच्या नातेवाइकांनी ही बस सुलतानपूर येथे थांबवून चालकाला जाब विचारला. त्यामुळे तेथे माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. या प्रकाराबाबत माहिती मिळताच मेहकरचे पाेलिस उपनिरीक्षक पवार, पाे.काॅ. राजेश जाधव यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यातच गर्दीचा फायदा घेत आराेपी खासगी बसचालक फरार झाला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मेहकर पाेलिसांनी खासगी बसचालक आसीफ शे. बागा याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून रिसोड (जि. वाशिम) पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
प्रवाशांना मनस्ताप
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे खासगी बसमधील प्रवासी प्रचंड धास्तावले हाेते. दोन दिवसांची सुटी आटोपून अनेकांना वेळेत पोहोचायचे होते, तर काही विद्यार्थी परीक्षेसाठी रात्रीचा प्रवास करून सकाळी लवकरच पाेहोचण्याच्या नियाेजनाने बसमध्ये बसले हाेते. मात्र, या अनपेक्षित प्रकारामुळे त्यांना दाेन तास ताटकळत बसावे लागले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.