मुलीच्या लग्नापूर्वीच शेतकरी वडिलांनी केली आत्महत्या
By सदानंद सिरसाट | Published: March 16, 2024 03:06 PM2024-03-16T15:06:51+5:302024-03-16T15:07:03+5:30
१५ फेब्रुवारी रोजी आलेल्या चक्रीवादळ व गारपिटीमुळे बंडू पाटील यांच्या शेतातील संपूर्ण २ एकर मका भुईसपाट झाला. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे १ लाख रुपयांचे कर्ज होते.
वसाडी (बुलढाणा) : मुलीचे लग्न येत्या २२ मे रोजी ठरले असताना शेतातील मका पीक भुईसपाट झाले. तर त्याचवेळी बँकेच्या १ लाखाच्या कर्जासाठी सुरू असलेल्या चकरा, याप्रकाराला कंटाळून नांदुरा तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी रवींद्र मुरलीधर कोळस्कार ऊर्फ बंडू पाटील यांनी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.
१५ फेब्रुवारी रोजी आलेल्या चक्रीवादळ व गारपिटीमुळे बंडू पाटील यांच्या शेतातील संपूर्ण २ एकर मका भुईसपाट झाला. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व सततच्या नापिकीमुळे कर्ज भरू न शकल्याने बँकेचे अधिकारी वसुलीसाठी त्रास देत असत. मुलीचे लग्न २२ मे २०२४ रोजी ठरले.
शेतात डौलात उभा असलेला मका गारपीट व चक्रीवादळामुळे एका रात्रीत भुईसपाट झाला. उपजीविकेचे एकमेव साधन असलेल्या शेती व शेतपिकाचे झालेले नुकसान या सर्व बाबींचा मनस्ताप झाला. ९ मार्च रोजी सायंकाळी शेतात विषारी कीटकनाशक औषध प्राशन केले. त्यांना नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जैस्वाल यांनी तातडीने खामगाव येथे पाठविले. तब्येत बिघडल्यामुळे अकोला येथे हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर १५ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.