शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी उपसंचालक! MPSC कृषी परीक्षेत भेंडवडचा तुषार राज्यात प्रथम
By सदानंद सिरसाट | Published: May 11, 2024 08:55 PM2024-05-11T20:55:56+5:302024-05-11T20:57:06+5:30
सदानंद सिरसाट-नानासाहेब कांडलकर, जळगाव जामोद (खामगाव, जि. बुलढाणा): तालुक्यातील भेंडवड येथील तुषार विठ्ठल वाघ या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी ...
सदानंद सिरसाट-नानासाहेब कांडलकर, जळगाव जामोद (खामगाव, जि. बुलढाणा): तालुक्यातील भेंडवड येथील तुषार विठ्ठल वाघ या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याची कृषी उपसंचालक या पदावर नियुक्ती झाली आहे. त्याने नुकत्याच आयएएस झालेल्या डॉ. श्रीकृष्ण सुशीर यांच्यानंतर जळगाव तालुक्याला पुन्हा एक बहुमान मिळवून दिला आहे.
तुषार वाघ याने दहावीपर्यंतचे शिक्षण भेंडवळ येथेच घेतले. दी न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयात बी.एस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली. राहुरी कृषी विद्यापीठातून एम. एस्सी. कृषी ही पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यानंतर प्रथम त्याने खासगी नोकरी केली. ती सोडून देत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेचा अभ्यास केला. यामध्ये त्याला आई-वडिलांची साथ मिळाली. पहिल्या प्रयत्नातच त्याची आयोगाकडून मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड झाली.सोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कृषी अधिकारी पदावर निवड झाली होती; परंतु, मोठ्या पदावर जाण्याची धडपड सुरूच होती. त्याने पुन्हा आयोगाची परीक्षा दिली. त्यामध्ये महाराष्ट्रातून प्रथम येत कृषी उपसंचालक वर्ग एक या पदासाठी त्याची निवड झाली. तुषारचे वडील विठ्ठल वाघ यांच्याकडे चार एकर शेती असून, आई गृहिणी आहे. त्याच्या यशाबद्दल सातपुडा शिक्षण संस्थेच्या वतीने माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
अभ्यासातील एकाग्रता महत्त्वाची - तुषार वाघ
घरी राहूनच अभ्यास केला. कुठलेही क्लासेस लावले नाहीत. अभ्यास करताना मनाची एकाग्रता कायम ठेवली. त्यामुळे यश मिळाले. विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान संग्रहित ठेवत, एकाग्रतेने अभ्यास केल्यास निश्चित यश मिळते, असे मत तुषार वाघ याने व्यक्त केले.