अंबाबरवा अभयारण्यातील ‘भुताचे झाड’ वेधतेय पर्यटकांचे लक्ष; झाडाला हात लावल्यास पावडरसारखे कण हवेत उडतात
By विवेक चांदुरकर | Published: January 21, 2024 05:14 PM2024-01-21T17:14:26+5:302024-01-21T17:14:40+5:30
सातपुडा पर्वत रांगेतील अंबाबरवा अभयारण्यात ‘भुताचे झाड’ आहे. या झाडाचे खोड पांढरे असून, पानगळ झाल्यानंतर झाड चांदीसारखे पांढरेशुभ्र दिसते.
अझहर अली
संग्रामपूर : सातपुडा पर्वत रांगेतील अंबाबरवा अभयारण्यात ‘भुताचे झाड’ आहे. या झाडाचे खोड पांढरे असून, पानगळ झाल्यानंतर झाड चांदीसारखे पांढरेशुभ्र दिसते. रात्रीच्या अंधारात पांढर्या सालीमूळे हे चमकते. त्यामुळे त्याला भुताचे झाड म्हणतात. भुताचे झाड म्हणून ओळख असलेले अनेक वृक्ष अंबाबरवा अभयारण्यात असून, पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
सातपुडा पर्वत दऱ्या- खोऱ्या, दाट झाडी, नद्या- नाले ओढ्यांनी वेढलेला आहे. १५ हजार ८३९.७५ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावरील वनात अंबाबरवा अभयारण्य आहे. येथे वसाली, अंबाबरवा, चुनखेडी, मांगेरी, गरमपाणी या भागात भुताचे झाड नावाचे असंख्य वृक्ष आहेत. पानगळ झालेले हे झाड पूर्णतः चांदी सारखे पांढरेशुभ्र दिसते. रात्रीच्या अंधारात ते चमकते. मराठीत या वृक्षाला भुल्या म्हणतात. या झांडाचे खोड व फांद्या नितळ, गुळगुळीत, पांढरीशुभ्र आहेत. झाडाच्या सालीला हात लावल्यास पावडर प्रमाणे छोटे- छोटे कण हवेत उडायला लागतात. या झाडाला इंग्रजीमध्ये ‘घोस्ट ट्री’ असं नाव दिलं आहे. त्यामुळे पानगळ झाल्यानंतर सुध्दा वृक्ष अतिशय सुंदर दिसतो. नवीन फुलांच्या पाकळ्या हिरव्या असतात. हळूहळू काळ्या, पिवळसर आणि शेवटी मातकट बदामी रंगाची फुले होऊन सगळ्या फुलांचा एक चिकट असा गोळा बनतो. उन्हाळ्यात या झाडाला फळे लागायला सुरुवात होते. फळे पिकल्यावर ती जांभळट लाल रंगाच्या फुलांसारखे दिसू लागतात.
झाडाचे शास्त्रीय नाव "स्टरकुलिया युरेंस"
या फुलांचा वास हा घोड्याच्या लीद सारखा असतो. या झाडाचे वनस्पती शास्त्रीय नाव "स्टरकुलिया युरेंस" आहे. फुलांचा आकार ४ ते ५ मिलिमीटर एवढाच असतो. एकाच गुच्छात नर, मादी आणि उभयलिंगी अशा तीनही प्रकारची फुले असतात.
फुले दिसतात पानांसारखी
फळे पिकू लागल्यानंतर झाडांना पालवी फुटू लागते. याची फुले फुलासारखी नसून पानासारखी दिसतात तर याची फळे फळांसारखी नसून फुलांसारखी दिसतात. येथे अनुकूल वातावरणामुळे हे वृक्ष ४५ ते ५० फुटांपर्यंत वाढलेले आहेत.
अंबाबरवा अभयारण्याला निसर्ग सौदर्य लाभले आहे. येथे वाघोबांच्या दर्शना सोबत भुताचे झाड म्हटल्या जात असलेले वृक्ष आहेत. वाघ आणि भुताचे झाड बघण्यासाठी पर्यटकांनी अंबाबरवा अभयारण्यात भेट द्यावी.
- सूनिल वाकोडे, वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) सोनाळा ता. संग्रामपूर