नेत्यांना गावबंदीचे लोण आता बुलढाण्यात, आरक्षण लढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा
By निलेश जोशी | Published: October 27, 2023 05:46 PM2023-10-27T17:46:09+5:302023-10-27T18:14:27+5:30
अन्य गावातही हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता
नीलेश जोशी, राहेरी बुद्रूक (जि. बुलढाणा): राज्य शासनास मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेले असतांनाच त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रूक ग्रामस्थांनीही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आमदार, खासदार तसेच पुढारी लोकांना गावबंदीचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
२७ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील फलक गावाच्या प्रवेशद्वारावर छळकावत ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणांनी ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला होता. सोबतच यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर छळकवण्यात आलेल्या फलकावरच राजकारण्यांनी अकारण गावात येऊन अपमान करून घेऊ नये अशी सुचनाही ग्रामस्थांनी फलकावर लिहीलेली आहे.
त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भाने ग्रामस्थांची ही भूमिका आता चर्चेत आली आहे. येथील ग्रामस्थांची भूमिका बघता याचे लोन जिल्ह्यातील अन्य गावातही पसरण्याची शक्यता आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक गावांमध्येही यामुळे आता नेत्यांना गावबंदी केली जाऊ शकते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून या लढ्याला आता बुलढाणा जिल्ह्यातही वाढता पाठिबां मिळत आहे. राहेरी बुद्रूक गावात लोकप्रतिनिधी, नेते व त्यांच्या कार्यकर्त्याना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहे. जो पर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत गावात प्रवेश नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
दरम्यान राहेरी बुद्रूक येथील ग्रामस्थ मदन देशमुख यांनी ,‘जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी गावामध्ये येऊ नये’, असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.