तीन मनोयात्रींच्या अंधकारमय जीवनात मायेचा प्रकाश; दिव्य सेवा प्रकल्पाची किमया
By ब्रह्मानंद जाधव | Published: August 6, 2023 02:23 PM2023-08-06T14:23:02+5:302023-08-06T14:25:01+5:30
सोलापूरची सोनाली, लातूरची रेखा आणि वाशिमचा प्रभू स्वगृही
बुलढाणा : तालुक्यातील वरवंड येथील दिव्य फाउंडेशन समाजसेवेचा वसा घेऊन मनोयात्रींचा प्रवास सुखकारक केला आहे. दिव्य सेवा प्रकल्पातील बरे झालेले तीन मनोरुग्ण सोलापूरची सोनाली, लातूरची रेखा आणि वाशिमच्या प्रभूला त्यांच्या स्वगृही पोहोचविले आहे. त्यामुळे या तीन मनोयात्रींच्या अंधकारमय जीवनात दिव्य सेवा प्रकल्पाने मायेचा प्रकाश टाकला आहे.
बुलढाण्यालगत असलेल्या वरवंड येथील दिव्य सेवा प्रकल्पात सद्य:स्थितीत ९१ मनोरुग्ण दाखल आहेत. त्यापैकी तीन मनोरुग्णांची प्रकृती ठीक झाल्याने आणि त्यांनी राहत असलेल्या मूळ गावाचा पत्ता दिल्याने कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांना स्वगृही पोहोचते करण्यात आले. सोलापूरची सोनाली चार वर्षांपासून मनोवस्था बिघडल्यामुळे कुटुंबापासून दुरावली होती. सोनाली दिव्य सेवा प्रकल्पात गेल्या एक वर्षापासून उपचार घेत होती. योग्य उपचारामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला तिच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. सोनालीचे मुले, वडील, भाऊ, वहिनी यांच्यासाठी सोनियाचा दिवसच उजाडला.
लातूरच्या रेखाविषयी लातूर जिल्ह्यातील मुरूड पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी व समाजकार्यकर्ते राहुल पाटील, सय्यद मुस्तफा, आशिष गायकवाड यांनी दिव्या फाउंडेशनला माहिती दिली होती. या माहितीवरून रेखाला दिव्य सेवा प्रकल्पात लातूर येथून आणून दाखल करून घेण्यात आले होते. रेखाला पाच महिन्यांचा अवधी मानसिक प्रकृती ठीक होण्यासाठी लागला. सात वर्षांपासून मन:स्थिती ठीक नव्हती. विचित्र वागण्यामुळे घरातले लोक वैतागले असताना तीही अचानक निघून गेली होती. दरम्यान, रेखा बेपत्ता झाल्याची तक्रार कर्नाटक येथील बेळगाव शहापूर येथे दाखल करण्यात आली होती. रेखा कुटुंबात पोहोचल्यामुळे तिचा साडेसहा वर्षांचा मुलगा, दोन मुली, सासू-सासरे नवरा, आई, वडील, भाऊ, मामा अशा आप्त परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. वाशिम येथील प्रभूजी आठ महिन्यांपासून दिव्य सेवा प्रकल्पात उपचार घेत होते. त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्याला स्वगृही पोहोचिवण्यात आले.
मनोरुग्ण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात राहणाऱ्या, रस्त्यावर झोपणाऱ्या अशा माणसांसाठी काम करण्यात खरा आनंद आहे. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा माराव्यात. त्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टीची किळस न करता त्यांचं सुख-दुःख जाणून घ्यावे. त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांना मदत करून त्यांचा सांभाळ करावा, हेच ध्येय.
- अशोक काकडे, संस्थापक अध्यक्ष, दिव्या फाउंडेशन, बुलढाणा