मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा

By संदीप वानखेडे | Published: October 31, 2023 03:29 PM2023-10-31T15:29:13+5:302023-10-31T15:30:57+5:30

या आंदाेलनामुळे महामार्गावर दाेन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या.

The Maratha community's Rasta Roko movement at Deulgaon Mahi, support for Manoj Jarange Patil's hunger strike | मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा

मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा

देऊळगाव मही : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाजाने ३१ ऑक्टाेबर राेजी सोलापूर-मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदाेलनामुळे महामार्गावर दाेन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या.

आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात देऊळगाव मही परिसरातील मराठा व धनगर समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी शेतकरी पुत्र मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे तर धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाजाचे सुरेश बडगर हे चौंढी येथे उपोषणास बसले होते. त्यावेळी सरकारने त्यांना सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही म्हणून हे दोन्ही लढे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात मराठा व धनगर समाजामध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. 

सरकार व लोकप्रतिनिधींविषयी दोन्ही समाज आक्रमक झाले आहेत. अनेक गावांत नेत्यांना गावबंदी केली जात आहे. त्यामुळे शासनाने सकारात्मक पावले उचलून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार देऊळगाव राजा यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे. यावेळी देऊळगाव राजा पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: The Maratha community's Rasta Roko movement at Deulgaon Mahi, support for Manoj Jarange Patil's hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.