घंटागाडी कामगारांच्या झोपो आंदोलनामुळे पालिकेची उडाली झोप!
By अनिल गवई | Published: December 2, 2023 03:05 PM2023-12-02T15:05:26+5:302023-12-02T15:05:35+5:30
घंटागाडी कामगार आंदोलनावर ठाम, नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीला पोलीसांचा पहारा
खामगाव: स्थानिक नगर पालिकेने कमी केलेल्या कामगार कपाती विरोधात कंत्राटी घंटागाडी कामगारांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शनिवारी आंदोलनाच्या दुसर्या दिवशी कामगारांनी पालिकेची पर्यायी यंत्रणा हाणून पाडण्यासाठी झोपो आंदोलन केले. त्यामुळे पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. कचरा व्यवस्थापनाचा मक्तेदाराचीही या कामगारांनी अक्षरक्ष: झोप उडविली. त्यामुळे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीला पोलीसांचा पहारा लागवण्यात आला होता.
याबाबत सविस्तर असे की, येथील नगरपालिका प्रशासनाच्या अंतर्गत १३ घंटागाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घंटागाडीवरील २६ कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने शुक्रवारपासून घंटागाडी कामगारांनी कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. शनिवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पालिका प्रशासनाने कचरा उचल प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन विभागातील चालक आणि काही इतर कंत्राटी कामगारांच्या साहाय्याने कचरा उचल प्रक्रीया सुरू करण्यापूर्वीच संप पुकारलेल्या कामगारांनी झोपो आंदोलन केले. या आंदोलना उपेक्षित दलित सामाजिक परिषद व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने पुकारलेल्या कामबंद आंदोलनात नगरपालिका अंतर्गत सर्वच घंटागाड्या कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत.
अंगावरून गाड्या काढाव्यात
नगर पालिकेने एकाचवेळी ५३ घंटागाडी सुरू कराव्यात, किमान वेतन दरानुसार वेतन देण्यात यावे, घंटागाडी कामगारांना इपीएफ सुविधा देण्यात यावी यासह नगर पालिका प्रशासनाने पालिकेतील चालक आणि कंत्राटी कामगारांच्या साहाय्याने घंटागाडीचे काम सुरू करण्यास घंटागाडी कामगारांनी विरोध दर्शिवला आहे. त्यानुसार शनिवारी घंटागाडी कामगारांनी रावण टेकडी येथील अग्निशमन कार्यालयासमोर झोपो आंदोलन केले. अंगावून गाड्या नेण्याचा इशाराही कामगारांनी यावेळी दिला. तसेच केवळ अग्नीशमनच्या गाडीलाच रस्ता दिला जाईल, असेही यावेळी कन्हैया सारसर यांनी माध्यमाकडे स्पष्ट केले.
कचरा व्यवस्थापन डमी कंत्राटदाराकडे
घंटागाडी कामगारांच्या संपामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, कचरा हाताळणूक आणि वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचवेळी नगर पालिकेतील आरोग्य विभागातील अधिकार्यांची सलगी, कचरा कंत्राटातील भागीदारीबाबतही यावेळी काही कामगारांनी जोरदार संताप व्यक्त केला. याबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात आल्याचेही कामगारांनी माध्यमांकडे सांगितले.