अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; संपत्तीच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या!

By सदानंद सिरसाट | Published: July 22, 2024 03:50 PM2024-07-22T15:50:17+5:302024-07-22T15:53:18+5:30

आरोपीसह त्याच्या मित्राला अटक.

The mystery of the unidentified body is solved | अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; संपत्तीच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या!

अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; संपत्तीच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या!

(सदानंद सिरसाट : खामगाव, जि. बुलढाणा)

संग्रामपूर-वरवट बकाल : वान नदीपात्रात पाच दिवसांपूर्वी कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले आहे. संपत्तीचा हिस्सा नावावर करून देत नसल्याच्या वादातून मुलाने त्याच्या मित्रासह वडिलांची हत्या केल्याचे उघड झाल्याने जामोद येथील रहिवासी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर, मृत अशोक विष्णू मिसाळ (५०) असून, अकोला जिल्ह्यातील, तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील रहिवासी आहे.

संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावालगत दक्षिण दिशेला वाननदी पात्रातील एका खड्ड्यात अनोळखी मृतदेह १६ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आढळून आला होता. तामगाव पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून पाचव्या दिवशी रविवारी या प्रकरणाचे रहस्य उलगडले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृत अशोक मिसाळ १३ जुलै रोजी दानापूर येथे घरात झोपेत असताना, रात्री मुलगा व त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दानापूर येथून दुचाकीने वान नदी पात्रातील एका खड्ड्यात रेती मिश्रीत दगडांनी बुजवून ठेवला. तिसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तपास करीत दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा तामगाव पोलिस ठाण्यात कलम १०३ (१), २३८ भा. न्या. संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तामगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे, विलास बोपटे, बिट जमादार अशोक वावगे, रामकिसन माळी, प्रमोद मुळे, विकास गव्हाड, संतोष मेहेंगे, संतोष आखरे यांनी केली.

संपत्तीच्या हिश्शासाठी घडले हत्याकांड
वडिलांकडे संपत्तीचा हिस्सा नावावर करून देण्याची मागणी नेहमी आरोपी मुलाकडून होत होती. मात्र, मृतकाने संपत्ती नावावर करून दिली नसल्याच्या कारणावरून मुलाने हा प्रकार केला. याप्रकरणी जामोद येथील आरोपी मुलगा प्रमोद उर्फ शुभम अशोक मिसाळ (२४), त्याचा मित्र राहुल रामदास दाते (२५) या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुलगा आल्यानंतर वडील गायब
शनिवारी दुपारी आरोपी प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ हा वडिलांच्या भेटीसाठी आला होता. रात्रभर अशोक मिसाळ यांच्यासोबत होता. दुसऱ्या दिवशी कोणालाही काही न सांगता परस्पर जामोद येथे निघून गेला, तेव्हापासूनच अशोक मिसाळ हेसुद्धा गायब झाल्याची माहिती पुढे आली.

२० वर्षांपासून होते वेगळे
अशोक मिसाळ हे त्यांची पत्नी व मुलापासून गेल्या २० वर्षांपासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांच्या नावावर असलेली जमीन व प्लॉट हे त्यांची पत्नी व मुलाच्या नावावर करून देत नव्हते, तसेच त्याची परस्पर विक्री करीत होते. याबाबत मुलगा प्रवीण हा दानापूर गाठून वडिलांशी वाद घालत होता.

Web Title: The mystery of the unidentified body is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.