गव्हात वाढले टुशांचे प्रमाण, भाव कमी, उत्पादनातही घट

By विवेक चांदुरकर | Published: April 5, 2024 04:57 PM2024-04-05T16:57:32+5:302024-04-05T16:58:17+5:30

गहू उत्पादक शेतकरी संकटात, उत्पादन खर्चही निघेना.

the price of wheat decreased and the production also decreased in buldhana | गव्हात वाढले टुशांचे प्रमाण, भाव कमी, उत्पादनातही घट

गव्हात वाढले टुशांचे प्रमाण, भाव कमी, उत्पादनातही घट

विवेक चांदूरकर,खामगाव : गव्हाच्या पिकात टुशांचे प्रमाण वाढले आहे. एका क्विंटलमध्ये जवळपास २५ किलो टुसा निघत आहे तसेच यावर्षी गव्हाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांनी घट आली असून, भावही अल्प आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात रब्बी हंगामात गव्हाची पेरणी ५७,०५९ हेक्टरवर करण्यात आली आहे. गव्हाचे सरासरी पेरणी क्षेत्र ५५,३९६ हेक्टर आहे. यावर्षी १०३ टक्के पेरणी झाली आहे. गतवर्षी गव्हाला २,४०० ते २,५०० रूपये भाव होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

सध्या गहू पीक काढणीला आले आहे. शेतकरी हार्वेस्टरने गव्हाची काढणी करीत आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे गव्हाचे पीक झाेपले. त्यामुळे उंब्या भरल्या नाहीत. परिणामी टुशांचे प्रमाण वाढले आहे. टुशांच्या प्रमाणामुळे व्यापाऱ्यांनी भाव पाडले असून, अल्प भावात गव्हाची खरेदी करीत आहेत. आधीच गव्हाला भाव कमी आहे. त्यातच उत्पादनात घटल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

गव्हाचे भाव पडले-

गतवर्षी गव्हाला २,४०० ते २,५०० रूपये भाव होता. यावर्षी केवळ १,७०० ते १,८०० रूपये भाव मिळत आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाला ४ एप्रिल रोजी १,९५० ते २,६०० रूपये दर मिळाला. सरासरी भाव २,१०० रूपये भाव मिळाला. बाजार समितीत २३० क्विंटलची आवक झाली होती. ग्रामीण भागात गव्हाची खरेदी कमी भावात करण्यात येत आहे.

यावर्षी गहू पिकात टुशांचे प्रमाण अधिक आहे. तसेच उत्पादनात जवळपास ५० टक्क्यांनी घट आली आहे. त्यातच भावही कमी आहे. परिणामी गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामातही नुकसान सहन करावे लागत आहे - कृष्णा पाटील, शेतकरी

अवकाळी पावसामुळे गहू खाली पडल्यानंतर उंब्या भरत नाहीत. त्यामुळे टुशांचे प्रमाण वाढते. तसेच गहू आंबट ओला असताना काढला तर टुशांचे प्रमाण वाढते. ही हार्वेस्टिंगची समस्या आहे.-अनिल गाभणे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद.

Web Title: the price of wheat decreased and the production also decreased in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.