महाराष्ट्राच्या सात खेळाडूंची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड, १ मेपासून जालंधरमध्ये होत आहे स्पर्धा
By निलेश जोशी | Published: April 17, 2023 06:52 PM2023-04-17T18:52:42+5:302023-04-17T18:52:52+5:30
बुलढाणा: येथील सहकार विद्यामंदिराच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या तीन दिवशीय राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचा १६ एप्रिल ...
बुलढाणा: येथील सहकार विद्यामंदिराच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या तीन दिवशीय राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचा १६ एप्रिल रोजी सायंकाळी ग्रँन्डमास्टर अभिजत कुंटे आणि शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त स्वप्नील धोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. या वेळी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या ७ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सहकार विद्यामंदिराच्या सभागृहात १४ ते १६ एप्रिल ही स्पर्धा घेण्यात आली होती.सायंकाळी आठव्या फेरीनंतर ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, स्वप्नील धोपडे यांनी स्पर्धेतील खेळाडूंना सातत्य व सरावाचे महत्त्व विषद करत कठोर मेहनतीशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तसेच ज्यांना अपयश आले त्यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जामोने सरावास प्रारंभ करावा, असे स्पष्ट केले. सोबतच दररोजचा सराव आपल्यास उत्तमोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देत असतो. पंरतू खेळामध्ये एकाच चुकीची पुनर्रावृत्ती होऊ नये. त्याशिवाय यशाचे शिखर गाठता येत नाही, असा मौलिक सल्लाही ग्रँन्डमास्टर अभिजीत कुंटे यांनी यावेळी खेळाडूंना दिला.
या स्पर्धेत उत्कृष्ठ खेळ करणारा आशिष चौधरी (अहमदनगर) आणि प्रथमेश शेरला (पुणे) यांची मुलांमधून जालंधर येथे १ ते ९ मे दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. दरम्यान मुलींमधून पाच जणी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामध्ये सानंदी भट (ठाणे), संस्कृती वानखेडे (अकोला), कीर्ति पटेल (मुंबई), श्रेया हिप्परगिरी (सांगली) आणि सानी देशपांडे (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी जळगाव खान्देशची भाग्यश्री पाटील ही राष्ट्रीय विजेती ठरल्यामुळे या स्पर्धेतून दोन ऐवजी पाच मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बक्षीस वितरण सोहळ्याला अभिजित कुंटे, राज्य सहसचिव हेमंत पाटील, अंकुश रक्ताडे, पंच प्रवीण ठाकरे, अमरीश जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते.