शिवसेना ठाकरे गटाकडून पोलीस स्टेशनसमोर ठेचा भाकर आंदोलन
By ब्रह्मानंद जाधव | Published: June 20, 2023 06:01 PM2023-06-20T18:01:46+5:302023-06-20T18:02:26+5:30
विदर्भातील पहिले स्मार्ट पोलीस स्टेशन तसेच जिल्ह्यातील महत्वाचे व मध्यवर्ती शहर असलेल्या चिखली पोलिस स्टेशनला गेल्या महिन्याभरापासून कायमस्वरूपी ठाणेदार नाही.
चिखली : शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व गुन्हेगारीला रोखण्यासाठी चिखली पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी ठाणेदार देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्या नेतृत्वात स्थानिक पोलिस स्टेशनमोर २० जून रोजी ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले.
विदर्भातील पहिले स्मार्ट पोलीस स्टेशन तसेच जिल्ह्यातील महत्वाचे व मध्यवर्ती शहर असलेल्या चिखली पोलिस स्टेशनला गेल्या महिन्याभरापासून कायमस्वरूपी ठाणेदार नाही. यामुळे शहरात गुंडगिरी, चोऱ्या, छेडखानीच्या घटना वाढत असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) कडून करण्यात आला आहे. यापृष्ठभूमीवर चिखली पोलिस ठाण्याला कायमस्वरूपी ठाणेदार देण्यात यावी, अशी मागणी कपिल खेडेकर व शिवसैनिकांनी यापूर्वी केली होती व आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. यापृष्ठभूमीवर खेडेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी २० जूनला चिखली पोलिस ठाण्यासमोर ठेचा भाकर आंदोलन केले. शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे.
कायद्याचा धाक राहिला नाही. त्यामुळे खमक्या आणि कायमस्वरूपी ठाणेदार चिखलीला ताबडतोब मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी खेडेकर यांनी केली. दरम्यान पोलिस स्टेशनचे प्रभारी सारंग नवलकार यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेची मागणी पोलीस अधिक्षकापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात कपिल खेडेकरांसह, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, शहरप्रमुख श्रीराम झोरे, तालुकाप्रमुख श्रीकिसन धोंडगे, रवी पेटकर, मंगेश इंगळे, दत्ता देशमुख, दत्ता सुसर, शैलेश डोणगावकर, संतोष देशमुख, गजानन पवार, प्रलय खरात, शेख बबलू, शेख साजिद, हरी इंगळे, गजानन कुटे, सतनामसिंग वधवा आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.