परीक्षा केंद्रावर शिक्षकच पोहचले विलंबाने; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ
By ब्रह्मानंद जाधव | Published: March 10, 2023 03:50 PM2023-03-10T15:50:48+5:302023-03-10T15:53:38+5:30
येथील जिजामाता कन्या शाळेवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असून त्याठिकाणी उर्दू तथा मराठी माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत
ब्रह्मानंद जाधव/ बुलढाणा
मोताळा : येथील दहावीच्यापरीक्षा केंद्र असलेल्या जिजामाता कन्या शाळेवर उर्दू शाळेचे शिक्षक कर्तव्यावर उशीरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी उद्भवलेल्या अडचणीत आवश्यक असलेले मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांनी दडपणाखाली पेपर सोडविल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.
येथील जिजामाता कन्या शाळेवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असून त्याठिकाणी उर्दू तथा मराठी माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यामध्ये जवाहर उर्दू हायस्कुलचे ३० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने जवाहर उर्दू हायस्कुलच्या एका शिक्षकाची त्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर शिक्षकांना दहा वाजता, तर विद्यार्थ्यांना साडेदहा वाजेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३ मार्च रोजी मराठी विषयाच्या पेपरला जवाहर उर्दू हायस्कूलकडून नियुक्त करण्यात आलेले एक शिक्षक हे सकाळी सव्वाअकरा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचले नाही. म्हणून त्यांच्याठिकाणी इतर शिक्षकाची वेळेवर नियुक्ती करण्यात आली. उर्दू माध्यमाचे शिक्षक उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचल्यामुळे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी आलेल्या अडचणी ऐकून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी उर्दू माध्यमाचे शिक्षक वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थी गोंधळले होते. मराठी माध्यमातील शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थीत हाताळला न आल्याने विद्यार्थ्यांना दडपणाखाली पेपर सोडवावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणीक नुकसान झाले आहे. यासंबंधी इसा खान, मलंग शाह, शे. जावेद, शे. शफीक आणी म. इकबाल या पालकांनी जवाहर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार करून त्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.