खामगावातील चोरट्यांना आता चंदनाचा लळा; नॅशनल हायस्कूलमधील चंदनाचे झाड चोरीला
By अनिल गवई | Published: January 18, 2023 01:42 PM2023-01-18T13:42:41+5:302023-01-18T13:42:53+5:30
याप्रकरणी नॅशनल हायस्कूल आणि महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने खामगाव शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
खामगाव: शहरातील शैक्षणिक संस्था तसेच महाविद्यालयातील चंदनाची झाडे चोरीच्या घटना अलीकडच्या काळात वाढीस लागल्या आहेत. स्थानिक नॅशनल हायस्कूलमधील चंदनाचे झाड रात्री चोरीला गेले. ही घटना बुधवारी सकाळी उजेडात आली.
खामगाव शहरातील पंचशील होमिओपॅथीक महाविद्यालयातील तीन चंदनाची झाडे चोरीला गेल्याच्या वृत्ताची शाई वाळते ना वाळते तोच, १७ जानेवारीच्या रात्री नॅशनल हायस्कूल मधील एक चंदनाचे झाड चोरीला गेले. ही घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. याप्रकरणी नॅशनल हायस्कूल आणि महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने खामगाव शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
या तक्रारीच्या अनुषंगाने खामगाव शहर पोलीसांनी घटनास्थळाचे स्थळ निरिक्षण केले. यात चंदनाचा झाडाचा बुंधा कटर मशीनच्या साहाय्याने चोरून नेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यामुळे गत काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यासोबतच चंदन तस्करांनीही डोके वर काढल्याचे चित्र अलिकडच्या घटनांवरून दिसून येते, अशी चर्चा जनमाणसात होत आहे.
सात चंदनाची झाडे चोरीला!
पंचशील होमीओपॅथिक महाविद्यालयातील तीन, भारतीय स्टेट बँकेच्या आवारातील दोन, नॅशनल हायस्कूल आणि रायगड कॉलनीतील प्रत्येकी एक अशी सात झाडे अलिकडच्या काळातच चोरीला गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खामगाव शहरातील चोरट्यांना आता चंदनाचा लळा लागल्याची चर्चा आहे.