चिखलीत 'बर्निंग' बसचा थरार; वऱ्हाड घेऊन येणारी खासगी बस जळून खाक!
By संदीप वानखेडे | Published: June 25, 2024 11:35 AM2024-06-25T11:35:54+5:302024-06-25T11:36:28+5:30
चहासाठी थांबल्याने ४८ वऱ्हाडी थोडक्यात बचावले
चिखली : चंद्रपूर येथून बुलढाणाकडे वऱ्हाडी घेवून निघालेल्या एका खासगी बसने अचानकपणे पेट घेतल्याने संपूर्ण बस जाळून खाक झाल्याची घटना स्थानिक मेहकर फाटा येथे पहाटे 4 विजेच्या सुमारास घडली आहे. चहा घेण्यासाठी बस थांबलेली असतात हा थरार घडला. या बसमधून 48 वऱ्हाडी प्रवास करीत होते. दैव बलवत्तर म्हणून सर्व वऱ्हाडी या घटनेतून सुखरूपणे बचावले आहेत. मात्र वऱ्हाडी मंडळींच्या बॅग, मौल्यवान वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या आहेत.
बुलढाणा येथील 48 वऱ्हाडी चंद्रपूर येथील लग्न सोहळा आटोपून खासगी बसमधून परत बुलढाणा कडे येत होते. रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास बस चिखली स्थित मेहकर फाटा येथे पोहचल्यावर या ठिकाणी चहापाणी घेण्यासाठी बस थांबली होती. त्यामुळे बहुतांश प्रवासी बसमधून उतरले होते. तर काही प्रवासी बासमध्ये झोपलेले होते. याच दरम्यान बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत बसमधून उतरलेल्या प्रवासींनी बसमध्ये झोपलेल्या सर्वाना खाली उतरविले, यामुळे मोठा धोका टाळला असला तरी, बसने अवघ्या काही वेळातच मोठा पेट घेतल्याने काही क्षणात या बसचा कोळसा झाला. घटनास्थळी तातडीने अग्निशामक वाहन पोहोचले; मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. सदर खाजगी बस बुलडाणा येथील उत्तम पवार यांच्या मालकीची असल्याचे समजते. या घटनेत वऱ्हाडी, चालक, वाहक आदी सर्वजण सुखरूप बचावल्याने जीवित हानी टळली असली तरी बससह वरहडींचे सामान पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठी आर्थिक हानी झालेली आहे.