बसचे टायर झाले गरम, सुदैवाने दुर्घटना टळली; प्रवाशांचाही झाला खोळंबा

By निलेश जोशी | Published: August 30, 2023 06:59 PM2023-08-30T18:59:54+5:302023-08-30T19:00:05+5:30

मेहकर तालुक्यातील घटना, रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी आपल्या स्वकियांकडे निघालेल्या बसमधील जवळास ७१ प्रवाशांना वेळेत जाता आले नाही

The tires of the bus got hot, luckily the accident was avoided; Passengers were also hampered | बसचे टायर झाले गरम, सुदैवाने दुर्घटना टळली; प्रवाशांचाही झाला खोळंबा

बसचे टायर झाले गरम, सुदैवाने दुर्घटना टळली; प्रवाशांचाही झाला खोळंबा

googlenewsNext

मेहकर (जि. बुलढाणा) : अकोला आगाराच्या छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एमएच-११-बीएल-९२३१ क्रमांकाच्या बसची चाके गरम होऊन त्यातून धूर निघत असल्याने बस चालकाने बस मेहकर नजीक चिंचोली बोरे फाट्यावर थांबत समयसूचकता दाखवली. परंतु, रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाकडे जाण्यासाठी निघालेल्या महिला व पुरुष प्रवाशांना वेळेत दुसरी मदत न मिळाल्यामुळे त्यांना ताटकळत राहावे लागले.

अकोला आगाराची उपरोक्त बस ही सकाळी दहा वाजता मेहकर आगारातून छत्रपती संभाजीनगरसाठी निघाली होती. काही अंतर पुढे जाताच चिंचोली बोरे फाट्यावर एसटी बसचे टायर गरम होऊन त्यातून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे चिंचोली बोरे फाट्यावर बस थांबविण्यात आली. तेथे बस चालकाने बसच्या टायरवर पाणी टाकण्याचे काम सुरू केले होते.

त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी आपल्या स्वकियांकडे निघालेल्या बसमधील जवळास ७१ प्रवाशांना वेळेत जाता आले नाही. तसेच, राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक आगाराकडूनही वेळेत त्यांना मदत मिळाली नाही. परिणामी बसमधील प्रवाशांचेही मोठे हाल झाले. बसची आसन क्षमता ४५ असताना बसमध्ये ७१ प्रवासी होते. त्यावरून वाहनातील गर्दीची कल्पना यावी. जवळपास ११ वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही बस चिंचोली बोरे फाट्यावर तशीच उभी होती. त्यानंतर बस चालकाने सुरक्षितता वाटल्यानंतर ही बस पुढे नेल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या मेहकर येथील आगारातील सूत्रांनी दिली.

दुसरी बस न पाठविल्याने प्रवासी त्रस्त
सण-उत्सवाच्या काळात बसमधील प्रवाशांनाही आपल्या इप्सित स्थळी पोहोचावयाचे होते. परंतु, त्यांच्यासाठी वेळेत दुसरी बस उपलब्ध करण्यात न आल्याने प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच दुर्घटना होता होता थोड्यात बस बचावलेली असताना तिच बस पुढील प्रवासासाठी धोकादायक पद्धतीने नेण्यात तर आली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: The tires of the bus got hot, luckily the accident was avoided; Passengers were also hampered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.