जलवाहिनीला लागली गळती, खामगावचा पाणी पुरवठा विस्कळीत
By अनिल गवई | Published: June 10, 2024 01:42 PM2024-06-10T13:42:28+5:302024-06-10T13:42:42+5:30
वीज समस्या सुरळीत होताच, जलवाहिनीची समस्या ऐरणीवर
खामगाव: शहराला पाणी पुरवठा करणार्या खामगाव ते गेरू माटरगाव येथील जलवाहिनीला गळती लागली. तीन ते चार ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने खामगाव शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, खामगाव शहरातील पाणी टंचाई आणखी तीव्र होणार असल्याचे दिसून येते.
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील गेरू माटरगाव धरणावरून जळका भडंग येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत सुमारे २२ किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आली आहे. गेरू माटरगाव येथील धरणावरून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणल्यानंतर जळका येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी शुध्द केल्यानंतर घाटपुरी पाण्याची टाकीपर्यंत पाणी नेले जाते. तसेच वामन नगरातील बुस्टर पंप आणि घाटपुरी टाकीवरून शहराच्या विविध भागात पाण्याचा पुरवठा केल्या जातो.
दरम्यान, वारंवार होत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो. कधी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे पाणी पुरवठा लांबणीवर पडतो. तर कधी पाइपलाइनला गळती लागल्यानंतर शहरातील पाणी प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला नियमित तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून येते.
गेरू माटरगाव येथे लागली गळती
गेरू माटरगाव येथील धरण शिवारातील तारासिंग नामक शेतकर्याच्या शेताजवळ पाइपलाइनला दोन ते तीन ठिकाणी गळती लागली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा आता लांबणीवर पडणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे पाणी समस्या उद्भवली होती. तब्बल १६ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर आता पाइपलाइनला गळती लागली आहे.
चिखलामुळे दुरूस्तीत अडथळा
धरण परिसरात झालेल्या पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. शिवाय शेत शिवारातही पावसाचे पाणी साचल्याने पाइपलाइन दुरूस्तीत अडथळा निर्माण झाल्याचे समजते. त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याची चर्चा आहे.