बुलढाणा जिल्ह्यात हमालांच्या मुजरीची अदायगी उपरा-उपरीच!
By अनिल गवई | Published: October 4, 2022 07:48 PM2022-10-04T19:48:12+5:302022-10-04T19:49:04+5:30
शासकीय गोदामातील हमालांच्या नशीबी तीन-तीन महिने मजुरीची प्रतीक्षा कायम
अनिल गवई, खामगाव: जिल्हा पुरवठा विभागाकडून देयक मिळाल्यानंतरच शासकीय गोदामातील हमालांची मजुरी अदा केली जात आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच शासकीय गोदामातील हमालांना मजुरीसाठी तब्बल तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे.
जिल्ह्यातील शासकीय गोदामात नोंदणीकृत हमाल पुरविणाºया संस्थेकडून प्रत्येक महिन्याच्या ०५ तारखेपर्यंत ऑनलाइन पध्दतीने अथवा धनादेशाद्वारे मजुरी माथाडी मंडळात तर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नोंदीत हमाल कामगारांची जिल्हा माथाडी मंडळाने घोषित केलेली लेव्हीची रक्कम १५ तारखेपर्यंत माथाडी मंडळात जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर कंत्राटदार संस्थेने मजुरीच्या रक्कम माथाडी मंडळात जमा केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा पुरवठा विभागात सादर केल्यानंतर संबंधित रक्कमेची अदायगी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करणे अपेक्षित आहे. तसा लिखित करारच आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने देयकाची रक्कम अदा केल्यानंतरच साई मल्हार हमाल व मापाडी कामगार सहकारी संस्था मर्या. नाशिक या संस्थेकडून केली जात आहे. त्यामुळे हमालांना मजुरीच्या रक्कमेसाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर येत आहे.
एप्रिल-मे-जूनची मजुरी सप्टेंबरमध्ये!
जिल्ह्यात जिल्हा पुरवठा विभागाकडून देयक मिळाल्यानंतरच मजुरीची अदायगी केली जात आहे. त्यामुळे हमालांना मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागतेय. जिल्ह्यातील सर्वच हमालांना एप्रिल-मे-जूनची मजुरी सप्टेंबर महिन्यात अदा केली गेली. तर आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची प्रतीक्षा कायम आहे.
बुलडाणा जिल्ह्यात १६ शासकीय गोदाम
जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यात प्रत्येक एक शासकीय गोदाम आहे. त्याचवेळी साखरखेर्डा, अमडापूर आणि डोणगाव येथे प्रत्येकी एक प्रमाणे ०३ गोदाम आहेत. जिल्ह्यातील सर्वच १६ गोदामात १८० पेक्षा अधिक हमाल कार्यरत आहेत. त्यांना आवक २०- जावक १५ असे एकुण एका क्विंटलसाठी ३५ रुपये मजुरी अदा केली जाते.
"हमालांच्या मजुरीचे देयक गोदाम स्तरावरून तहसील कार्यालयाकडे पाठविले जाते. त्यानंतर तहसील स्तरावरून जिल्हा पुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी जाते. वरिष्ठ स्तरावरूनच हमालांच्या मजुरीचा प्रश्न मार्गी लागतो. सद्यस्थितीत खामगाव येथील गोदामातील कामकाज सुरळीत आहे", असे अमोल बाहेकर (गोदाम व्यवस्थापक, शासकीय गोदाम, खामगाव) यांनी सांगितले.