राऊतवाडी स्मशानभूमीतील साहित्याची चोरी व नासधूस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:10+5:302021-02-24T04:36:10+5:30
राऊतवाडीतील स्मशानभूमी उजाड ओसाड न ठेवता त्यास सर्वांगसुंदर बनविण्याचा ध्यास घेत या प्रभागाच्या नगरसेविका प्रा.डॉ.मीनल गावंडे ह्या अध्यक्ष असलेल्या ...
राऊतवाडीतील स्मशानभूमी उजाड ओसाड न ठेवता त्यास सर्वांगसुंदर बनविण्याचा ध्यास घेत या प्रभागाच्या नगरसेविका प्रा.डॉ.मीनल गावंडे ह्या अध्यक्ष असलेल्या राजमाता जिजाऊ अर्बन संस्थेने यात विशेष पुढाकार घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे यांनी ही स्मशानभूमी सर्व सोयींनी युक्त करून स्मशानभूमीला पर्यटनस्थळाचे स्वरूप देवून समाजापुढे एकक नवा आदर्श निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहेत. याअंतर्गत स्मशानभूमीत बांधकाम, सरणावर शेड आदी कामे सुरू असताना रात्रीच्यावेळी बांधकामाचे साहित्य, लोखंड आदी साहित्य सातत्याने चोरीला जात आहे. लहान-मोठ्या चोऱ्यांकडे दूर्लक्ष करून प्रा.गावंडे यांनी आपले काम सुरू ठेवले. सोमवारी रात्री स्मशानभूतील साहित्य पुन्हा चोरीला गेले. सोबतच चोरट्यांनी तीन शेड उद्धवस्त करून टाकले. या प्रकाराबाबत प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याशी चर्चा केली असून मुख्याधिकाऱ्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत पाेलिस तक्रार दाखल केली. यामध्ये न.प.मालकीचे/सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा १९९५ नुसार अथवा कायद्यातील योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र ठाणेदार गुलाबराव वाघ यांना देण्यात आले आहे.
कठोर कारवाई करा !
एका चांगल्या हेतूने व निस्वार्थ भावनेने स्मशानभूमीचे रूपडे पालटले जात असताना अज्ञात समाजकंटकांकडून हेतूपुरस्सरपणे स्मशानभूमील साहित्य लंपास करणे व दहन शेडची नासधूस करण्याचे काम झाले असल्याने शहरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासह भविष्यात कोणीही अशाप्रकारची कृती करू नये, यासाठी चोरट्यांचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शहरवासीयांकडूून होत आहे.