खामगाव नगर पालिका संकुलातील चोरी संशयाच्या भोवऱ्यात! पाणी पुरवठा विभागाचे १४ लाखांचे साहित्य लंपास
By अनिल गवई | Published: October 13, 2022 07:04 PM2022-10-13T19:04:12+5:302022-10-13T19:04:33+5:30
खामगाव नगर पालिका संकुलातील चोरी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
खामगाव (बुलडाणा) : स्थानिक नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तब्बल १४ लाखांचे महागडे सामान चोरी गेल्याचे प्रकरण आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चोरी प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होत असल्याने, या प्रकरणाचा तपास करताना पोलीसही भांबावून गेलेत. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेकडूनही या चोरीची चाचपणी केली जात असल्याचे समजते. खामगाव नगर पालिका प्रशासकीय इमारती नजीक निर्माणाधिन सांस्कृतिक सभागृहामागील व्यापारी संकुलातील पहिल्या माळ्यावर असलेल्या एका गोदामात नवीन नळ जोडणी आणि पाणी पुरवठा विभागाचे साहित्य ठेवले होते. यामध्ये नवीन वॉटर मीटर, पितळी व्हॉल्व आणि इतर साहित्याचा समावेश असून गोदामाचे शटर तोडून साहित्य चोरी गेल्याचे नगर पालिका पाणी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर १३ जुलै २०२२ रोजी पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने शहर पोलिस स्टेशन मध्ये ही तक्रार देण्यात आली. गुंतागुंतीमुळे शहर पोलिसांनी स्थळ निरिक्षणानंतरच याप्रकरणी तक्रारीनंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल केला होता.
असाही योगायोग
पाणी पुरवठा विभागाचे साहित्य चोरी गेले त्या रात्री नगर पालिकेच्या उत्तर प्रवेशद्वारावरील सीसी कॅमेरा बंद होता. त्याचवेळी पालिकेत रात्री कर्तव्यावर असलेला सुरक्षा रक्षक नेमका काय करीत होता? चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कंत्राटदाराचा अमरावती, नागपूरचा प्रवास कशासाठी? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चोरी की साहित्य केवळ कागदोपत्री
व्यापारी संकुलातील एका गाळ्याचे कुलूप तोडून साहित्य चोरून नेण्यात आले. चोरीनंतर चोरी झाल्यासारख्या कोणत्याही खुणा आढळून न आल्यामुळे सर्वप्रथम पोलीसांनीच या चोरी प्रकरणी संशय व्यक्त केला. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेनेही येथे पाहणी केल्याचे समजते. दरम्यान, येथे खरच चोरी झाली की केवळ कागदोपत्री पालिकेच्या दप्तरी साहित्याची नोंद झाली? हा प्रश्न सद्यस्थितीत अनुत्तरीत आहे.
नगर पालिकेतील चोरी 'एलसीबी'च्या रडावर
खामगाव नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील चोरी पूर्वीपासूनच संयशाच्या भोवºयात सापडली आहे. खामगाव शहर पोलीसांनीही घटनास्थळाची पाहणी केल्याशिवाय तात्काळ गुन्हा दाखल केला नव्हता. दरम्यान, पाणी पुरवठा विभागाचे महागडे साहित्य चोरी गेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाकडूनही पाहणी करण्यात आली आहे.
नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील चोरी प्रकरणी पालिका प्रशासनाने तक्रार दाखल केली होती. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जुलै महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीसांचा पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पाहणी आणि तपासणीबाबत आपणास माहिती नाही. अशी माहिती खामगावचे शहर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली.