स्वामी समर्थ केंद्रात मूर्तींची चोरी, अल्पवयीन चोरटे दोन तासात पोलिसांच्या ताब्यात
By निलेश जोशी | Published: June 3, 2024 04:25 PM2024-06-03T16:25:14+5:302024-06-03T16:26:30+5:30
शहरातील स्वामी समर्थ केंद्रातील मूर्तींसह पूजेसाठीचे साहित्य चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना बुलढाणा पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले.
बुलढाणा : शहरातील स्वामी समर्थ केंद्रातील मूर्तींसह पूजेसाठीचे साहित्य चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना बुलढाणा पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेले ५५ हजार २०० रुपयांचे संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले आहे. जनसामान्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या ठिकाणीच चोरट्यांनी हात घातला होता. त्यामुळे जनभावना विचारात घेता बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने पावले उचलून हालचाल केली.
स्वामी समर्थ केंद्रात पहाटे दरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आले. यामध्ये स्वामी समर्थांची पितळीची १२ हजार रुपये किमतीची चार किलो वजनाची मूर्ती, अष्टधातूची महादेवाची पिंड, चांदीचे २० तोळे वजनाचे २२ हजार रुपयांचे झुंबर, अष्टधातूंच्या हत्तीच्या दोन मुर्तींसह अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. प्रकरणी स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष शांताराम जंजाळकर (६७) यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून निरीक्षण केले. तसेच स्थानिकांशी विचारपूस करून गोपनीय माहितीच्या आधारावर आनंदनगर मधून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सांगितले.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि डीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नीलेश लोधी, पोलिस कॉन्स्टेबल युवराज शिंदे, विनोद बोरे, रमेश वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक लेकुरवाळे, संजय भुजबळ यांनी सहभाग घेतला होता. गुन्ह्यातील आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्यानुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.