मोताळा येथे पाच लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:39+5:302021-02-17T04:41:39+5:30
मोताळा : येथील आठवडी बाजार चौकातील मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी ४ लाख ८५ हजार ८५० रुपयांचा ऐवज लंपास ...
मोताळा : येथील आठवडी बाजार चौकातील मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी ४ लाख ८५ हजार ८५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेख मुस्ताक शेख इब्राहिम (वय ३९, रा. मोताळा) यांचे आठवडी बाजार चौकात सुरसंगम मोबाईल शॉप आहे. या दुकानात त्यांचा नवीन मोबाईल विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. शेख मुस्ताक यांनी सोमवारी रात्री साडे नऊ वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा मागील टिनपत्रा वाकवून आत प्रवेश केला व दुकानातील ११३ नवीन मोबाईल, ग्राहकांचे दुरुस्तीसाठी आलेले २५ जुने मोबाईल, ३५ मेमरी कार्ड, ३० पेनड्राईव्ह, मोबाईलचे चार्जर, पॉवरबँक, हेडफोन, ब्लुटूथसह इतर साहित्य असा एकूण ४ लाख ८५ हजार ८५० रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी पहाटे सदर प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच बोराखेडीचे ठाणेदार माधवराव गरुड, पीएसआय अशोक रोकडे, पीएसआय अनिल भुसारी यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. बुलडाणा येथील श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्टच्या टीमला बोलावण्यात आले होते. यावेळी जुली नामक श्वान सराफा गल्ली समोरून ताज चौकात जाऊन थबकली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. दरम्यान, एसडीपीओ रमेश बरकते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मागील काही दिवसांपासून परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शहरासह परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
याप्रकरणी शेख मुस्ताक शेख इब्राहिम यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४६१, ३८० भादंविनुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड करीत आहेत.