प्रिंपाळा येथील सरपंचाच्या घरी धाडसी चोरी; दीड लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:26 PM2018-10-06T12:26:38+5:302018-10-06T12:28:03+5:30
खामगाव : तालुक्यातील प्रिंपाळा येथील सरपंच डॉ.विठ्ठल पेसोडे यांच्या घरी सुमारे दीड लाखाची धाडसी चोरी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील प्रिंपाळा येथील सरपंच डॉ.विठ्ठल पेसोडे यांच्या घरी सुमारे दीड लाखाची धाडसी चोरी झाली. ही घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजता उघडकीस आली. सरपंच डॉ. विठ्ठल पेसोडे यांचे प्रिंपाळा येथे घर आहे. याठिकाणी त्यांचे वडील पांडुरंग पेसोडे यांच्यासह तिघेजण राहतात. दरम्यान, शुक्रवारच्या रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून कपाटातील ४० ग्रॅम सोने आणि रोख रक्कमेसह दीड लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बुलडाणा येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाद्वारे या चोरीचा पुढील तपास सुरू आहे. ४० ग्रॅम सोने आणि ३० हजार रूपयांची रोख रक्कम चोरी गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.