मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ
By admin | Published: September 25, 2015 12:10 AM2015-09-25T00:10:45+5:302015-09-25T00:10:45+5:30
मोताळा नगरपंचायतीद्वारे नागरिकांकडून प्रशासनाकडे हरकत दाखल.
मोताळा (जि. बुलडाणा) : जिल्हय़ातील बहुचर्चित व प्रथमच अस्तित्वात येणार्या मोताळा नगरपंचायतीच्या प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात चुका आढळून आल्या आहेत. यामुळे शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे हरकत दखल केली आहे. नगरपंचायत प्रशासकाला बुधवार, २३ सप्टेंबर रोजी या आशयाचे निवेदन देऊन मतदार यादीत दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे. मोताळा नगरपंचायतीसाठी एकूण १७ प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली होती. प्रभागांची रचना जाहीर झाल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मतदार यादय़ा प्रसिद्ध करून नागरिकांच्या हरकती व आक्षेप मागविण्यात आले होते. प्रसिद्ध झालेल्या या याद्यांमध्ये प्रचंड घोळ असून, अनेक चुका आहेत. एका वॉर्डातील नागरिक दुसर्या वॉर्डात दाखविणे, एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळया वॉर्डात, तर बाहेरगावी असलेल्या किंवा मृत पावलेल्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट असणे, दुसर्या वॉर्डातील मतदार भलत्याच वॉर्डात असणे, अनेकांची नावे दोनदा फोटोसह छापून येणे, एकाच व्यक्तीचे नाव दोन गावांत असणे असे प्रकार जवळपास सर्वच याद्यांमध्ये झाल्याच्या तक्रारी वॉर्ड क्रमांक ७ मधील शंकर पुंजाजी घडेकर, मधुकर घडेकर, भगवान मोरे, संजय सायखेडे, निना इंगळेसह इतर नागरिकांनी प्रशासकाकडे २३ सप्टेंबर रोजी केली आहे. वॉर्ड क्रमांक ७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये वॉर्ड क्र. ९ मधील दोन, वॉर्ड क्र. १ मधील चार, वॉर्ड क्र. ४ मधील दोन, वॉर्ड क्र. ८ मधील चार, वॉर्ड क्र. ६ मधील तीन अशी एकूण १५ नावे दुसर्या वॉर्डातील समाविष्ट झाली आहेत. यादीमध्ये पाच नावे दोन वेळा आली असून, मृत व्यक्तींचीसुद्धा नावे आली आहेत. या मतदारांचा मागील पाच ते सहा वर्षापूर्वीच मृत्यू झाला. याद्यांमध्ये बर्याच वॉर्डातील जवळपास ५0 ते ६0 लोकांची नावे यादीत समाविष्ट नाहीत. काहींचे फोटो नाही, काहींचे नावासमोर दुसर्याचा फोटो आहे. प्रसिद्ध झालेल्या सर्वच याद्यांमध्ये हा घोळ झाला आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेनुसार व नकाशानुसार प्रत्यक्ष पाहणी करून सर्व चुकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.