हंडाभर पाण्यासाठी केवढा हा आटापीटा, मेहकर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा
By ब्रह्मानंद जाधव | Published: June 20, 2023 05:20 PM2023-06-20T17:20:58+5:302023-06-20T17:21:38+5:30
भोसा परिसरात तर हंडाभर पाण्यासाठी वृद्ध महिलांनाही मोठा आटापीटा करावा लागत आहे.
मेहकर : तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा वाढतच आहेत. आतापर्यंत ज्या विहिरींचा पाण्यासाठी आधार होता, त्या विहीरींनी आता तळ गाठला आहे. पाऊस लांबल्याने टंचाईच्या सावट वाढत आहे. भोसा परिसरात तर हंडाभर पाण्यासाठी वृद्ध महिलांनाही मोठा आटापीटा करावा लागत आहे.
पाऊस लांबल्याने जलस्त्रोत घटले आहेत. अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मेहकर तालुक्यातील आदिवासीबहुल असलेल्या भागातही पाणीटंचाईने महिला त्रस्त आहेत. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन एक ते दीड किलोमीटर वरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरावे लागत आहे. शेतात काम करून मजुरी करावी की, पाणी भरावे असा प्रश्न महिलांसमोर निर्माण झाला आहे. भोसा या गावात ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. मात्र या तिन्ही विहिरीत पाणी नसल्याने येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. भोसा येथे जलजीवन मिशनचे एक कोटी ८८ लाख रुपयांचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू असून विहीर खोलीकरणासाठी संबंधित ठेकेदार अमोल म्हात्रे यांना उपविभागीय अधिकारी पाणी पुरवठा विभाग मेहकर यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु विहीर खोलीकरणाकडे अद्यापही दुर्लक्ष दिसून येते.
विहीर अधिग्रहणाची तात्पुरती व्यवस्था
मेहकर तालुक्यात ४६ ग्रामपंचायत अंतर्गत विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. तसेच वरुड, वरवंड, वडाळी या गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात ६९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे, परंतु ४६ गावात विहीर अधिग्रहणांचे प्रस्ताव टाकून त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे.
जलजीवन मिशनच्या कामाला मिळेना मुहूर्त
मेहकर तालुक्यात ९८ ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशनच्या कामाचे प्रस्ताव दिलेले असले, तरी अजूनही अनेक ग्रामपंचायतमध्ये जलजीवन मिशनच्या कामाला सुरुवात झाली नाही. यामध्ये द्रुर्गबोरी या गावाचा समावेश आहे. मेहकर तालुक्याची पाणीटंचाई पाहता जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे.