कृषी सिंचनासाठी पाण्याचे यंदा आरक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 03:58 PM2018-11-17T15:58:48+5:302018-11-17T15:58:58+5:30
बुलडाणा: जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
बुलडाणा: दुष्काळी स्थिती पाहता यावर्षी कृषी सिंचनासाठी पाणी न देण्याचे धोरण जिल्हा प्रशासनाने अवलंबले असून, प्रकल्पांमधील ३४ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांमध्ये अवघा १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, आगामी काळातील टंचाईची तीव्रता पाहता प्रसंगी अकोला, वाशिम व जळगाव खान्देश जिल्ह्यातून उपलब्धतेनुसार टँकरद्वारे पाणी आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन चाचपणी करीत आहे.
दुसरीकडे कंडारी, विद्रुपा, व्याघ्रा, केशव शिवणी, धामणगाव देशमुख, शिवणी आरमाळ येथील प्रकल्पात पाणीच उपलब्ध नसल्याने लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा पेच निर्माण होण्याची शक्यता पाहत ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणाहून संबंधित गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. उपरोक्त प्रकल्पात पाणीच उपलब्ध नसल्याने संबंधित गावातील पाणी आरक्षणाचाही पेच निर्माण झालेला आहे. नांदुरा, सिंदखेड राजा, मोताळा तालुक्यातील हे प्रकल्प असून, पाणी उपलब्ध नसल्याने येथील पाणी आरक्षण मंजूर करता आलेले नाही.
ज्ञानगंगा प्रकल्पातून खामगाव एमआयडीसी आणि अकोला जिल्ह्यातील दोन गावांसाठी नदीपात्र तथा कॅनॉलद्वारे सोडण्यात येणारे पाणी यंदा मात्र अभूतपूर्व टंचाईची शक्यता पाहता सोडण्यात येणार नसल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)