'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला प्रतिसाद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 11:43 AM2021-08-08T11:43:03+5:302021-08-08T11:43:24+5:30
My Daughter Bhagyashree : सहा तालुक्यांत एकही लाभार्थी नसल्याने याठिकाणी माझी कन्या भाग्यश्री योजनाच हरविल्याचे चित्र आहे.
- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेच्या धर्तीवर जिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे; परंतु या योजनेला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. या वर्षात अवघ्या २४ लाभार्थ्यांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. तर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत एकही लाभार्थी नसल्याने याठिकाणी माझी कन्या भाग्यश्री योजनाच हरविल्याचे चित्र आहे.
मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलांइतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाने बेटी बचाओ-बेटी पढाओ ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू केलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे, त्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या पार्श्वभूमीवर “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; परंतु या योजनेची जनजागृती अद्यापही पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेचा एकही लाभार्थी नाही. २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यात एकूण २४ लाभार्थी माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी पात्र ठरले आहेत. तर मागील वर्षी याहीपेक्षा कमी लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यामुळे जिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री योजनेची व्याप्ती वाढणे गरजेचे आहे.
असा मिळतो लाभ
१ ऑगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या मुलांना योजनेचा लाभ घेता येतो.
एक अपत्य कन्या असल्यास ५० हजार रुपये आणि दोन अपत्य कन्या असल्यास प्रत्येकी २५ हजार रुपये त्यांच्या नावे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात येते.
एक मुलीच्या अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.