जिल्ह्यात अद्यापही ३४ टक्के पेरण्या बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:17+5:302021-07-02T04:24:17+5:30
जिल्ह्यात प्रामुख्याने चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर या तालुक्यांत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ३२ टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला आहे. ...
जिल्ह्यात प्रामुख्याने चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर या तालुक्यांत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ३२ टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला आहे. अन्य तालुक्यांत तुलनेने कमी पाऊस असल्याने प्रामुख्याने या भागातील पेरण्या रखडलेल्या असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यातल्या त्यात शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील स्थिती बिकट असल्याचे एकंदरीत चित्र आहे. या तालुक्यांमध्ये अनुक्रमे ४.७ आणि ६.१७ टक्के पाऊस पडलेला आहे. बहुतांश घाटाखालील तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी दिसत आहे. परिणाम स्वरूप या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस पडण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील ७ लाख ३४ हजार १७७.२३ हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून त्यापैकी ४ लाख ८७ हजार ८७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये २ लाख ७२ हजार ६२० हेक्टरवर तेलबिया, ८९ हजार ९१२ हेक्टरवर अन्नधान्य, १३ हजार ४२१ हेक्टरवर तृणधान्याची पेरणी झालेली आहे. प्रामुख्याने सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. यासोबत कापसाचा पेरा हा आतापर्यंत १ लाख ३१ हजार १७५ हेक्टरवर झालेला आहे. सोयाबीन पिकालाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेले आहे.