चोरट्यांचा महागड्या मोबाईलवर डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:12+5:302021-07-02T04:24:12+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला हरवलेले, गहाळ झालेले आणि चोरीस गेलेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढल्याची बाब पोलीस अधीक्षक अरविंद ...
बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला हरवलेले, गहाळ झालेले आणि चोरीस गेलेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढल्याची बाब पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, बुलडाणा यांना सायबर पोलीस स्टेशनमार्फत हरवलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलसंबंधीची माहिती प्राप्त करून दैनंदिन कामांसोबतच मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पारित केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सायबर पोलीस स्टेशनमधील पोलीस पथकाच्या मदतीने सायबरकडे प्राप्त झालेल्या तक्रारीतील मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविली.
हस्तगत केलेले मोबाईल केले मूळ मालकास परत
मोबाईल शोधण्याच्या या मोहिमेअंतर्गत तब्बल १०० मोबाईल सायबर पोलिसांकडून हस्तगत केले आहेत. दरम्यान, हस्तगत केलेले सर्व मोबाईल संबंधित मूळ मालकास परत करण्याचे कर्तव्यदेखील पोलिसांनी बजावले आहे. याअनुषंगाने २८ जूनरोजी प्रभा हॉल, पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथे कोरोनासंदर्भाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन करून मोबाईल वाटप करण्यात आले. सायबर क्राईमबाबतही जनजागृती करण्यात आली.
या पथकाने राबविली मोहीम
मोबाईल शोधण्याची ही मोहीम पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, खामगाव अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या आदेशाने सपोनी विलासकुमार सानप, पोलीस अंमलदार ज्ञानेश नागरे, राजू आडवे, कैलास ठोंबरे, पवन मखमले, नंदकिशोर आंधळे, योगेश सरोदे, अमोल तरमळे, उषा वाघ यांच्या पथकाने राबवली.