मागील वर्षीच्या तुलनेत दीडपट पाऊस
By admin | Published: July 8, 2017 01:07 AM2017-07-08T01:07:55+5:302017-07-08T01:07:55+5:30
पावसाचे दिवस कमी; मात्र प्रमाण जास्त
खामगाव: परिसरात मागील वर्षी ७ जुलैपर्यंत झालेल्या पावसाच्या तुलनेत यावर्षी दीडपटीहून अधिक जास्त पाऊस पडला आहे. वास्तविक पावसाचे दिवस कमी आहेत; मात्र प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.
७ जून रोजी पावसाळा सुरू होत असल्याचे मानले जाते; मात्र बुलडाणा जिल्ह्यात साधारणत: १५ जूनपासून पावसाला सुरुवात होते. यावर्षी जूनच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. थोडा-थोडका नव्हे तर चांगला धो-धो पाऊस पडला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी घाई-घाईत शेतमशागतीची कामे उरकून पेरण्याही करून टाकल्या.
यानंतर मात्र बरेच दिवस पावसाने दडी मारली. पुढे जून महिना संपेपर्यंत पाऊस जवळपास गायबच राहिला. जुलैमध्ये त्याचे पुनरागमन झाले; मात्र तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या होत्या.
त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे. तर काही जणांच्या पेरण्या अद्याप खोळंबलेल्या आहेत. ७ जुलैपर्यंत एकूण पडलेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेतले तर गतवर्षीच्या तुलनेत दीडपटीहून अधिक पाऊस झालेला आहे.
त्यामुळे जमिनीतील ओल टिकत नसल्याने शेतकऱ्यांची पेरणीची हिंमत होत नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप खोळंबलेल्या आहेत.
तर अगोदरच पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या पेरण्या साधल्या असून, त्यांच्या पिकांची स्थिती चांगली दिसत आहे. त्यामुळे खामगाव परिसरातील पीक परिस्थितीत असमानता दिसून येते.
असे आहे पर्जन्यमान
मागील वर्षी ७ जुलैपर्यंत फक्त १०९.८ मिमी अर्थात ४.३ इंच पाऊस पडला होता. तर यावर्षी ७ जुलैपर्यंत १८०.२ मिमी अर्थात ७ इंच पाऊस पडला आहे. यावरून यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत दीडपटीहून अधिक पाऊस झाल्याचे दिसून येते. वास्तविक यावर्षी पावसाचे दिवस कमी असूनही प्रमाण जास्त आहे. कमी दिवसात जास्त पाऊस झाला असून, उन्हही प्रचंड तापत आहे.